देशातील सर्वात मोठी बँक असा तुरा मिरवणाऱ्या आयसीआयसीआय बँकेला अपंगत्व आलय.या अपंगत्वाच मुख्य कारण ठरतेय ते म्हणजे त्यांची स्वत:चीच नियमावली. एका अपंग व्यक्तीला निव्वळ तो अपंगत्व असल्याच्या कारणावरून गृहकर्ज नाकारण्यात आलय. त्यामुळे बँकेच्या अशा या अजब निर्णयामुळे त्या व्यक्तीला आता लॉटरीतल घर गमावण्याची वेळ आलीय. त्यामुळे देशातल्या मोठ्या बँका जर असा कारभार करत असतील सामान्यांनी आता कुणाकडे कर्ज मागावे असा प्रश्न उपस्थित होतोय.
विरार मधील (३८) वर्षीय संतोष साळवे यांना त्यांच्या १२ व्या वर्षी मणक्याच्या (ankylosing spondylitis) या दुर्गम आजाराने ग्रासले. यामुळे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. गेल्या २५ वर्षापासून ते भाड्याने विरार येथे राहत आहेत. या दरम्यान आपले स्वतःचे घर असावे या उद्देशाने त्यांनी विरार बोळींज म्हाडाच्या घराच्या लॉटरीत २.०८.२०१८ रोजी अपंगाच्या कोट्यातून लॉटरीचा अर्ज केला. या लॉटरीत त्यांच नशीब फळल आणि त्यांना २८.०१. २०१९ रोजी विरार बोळींज येथील योजनेतील संकेत क्रमांक २७४ इमारत क, येथे सदनिका मिळाली.
इतके वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर आता कुठे साळवे यांना स्वत:च हक्काच घर मिळणार होत. मात्र या घरासाठी त्यांना आता मोठ्या रक्कमेची जमवाजमवी करावी लागणार होती. यासाठी त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडे गृह कर्जासाठी अर्ज केला. दरम्यान त्यांच्याकडे म्हाडाचे संमती पत्र असल्याने बँकेने सुद्धा त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ न करता कर्ज मंजूर केले. १५ जुलै २०१९ रोजी त्यांना आयसीआयसीआय बँकेने २४ लाखाचे २० वर्षासाठी गुहकर्ज मंजूर केले. तसे मंजुरी पत्रसुद्धा आयसीआयसीआय बँकेने साळवे यांना दिले. तसेच कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी संतोष साळवे यांनी म्हाडाचा ना हरकत दाखला सुद्धा आयसीआयसीआय बँकेला सादर केला.
घर मिळणार, गृहकर्जहि मंजूर झालेय. त्यामुळे काहीसा चिंतामुक्त झालेल्या संतोष साळवे यांना आयसीआयसीआय बँकेने वाशीच्या शाखेत बोलावले. यावेळी त्यांना कुठलीही पत्रक न देता तुम्ही अपंग असल्याने आम्ही तुम्हाला गृहकर्ज देऊ शकत नाही असे सांगून त्यांना कर्ज नाकारल्याचे संतोष साळवे यांनी सांगितले. त्यामुळे एका खाजगी बँकेने त्यांचे मंजूर केलेले गृहकर्ज केवळ ते अपंग असल्याने नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपण केवळ अपंग असल्याने बँकेने आपले कर्ज नाकारले. अपंगांना कर्ज देऊ नये असा कोणता अजब नियम बँकेचा आहे. मग अपंगांनी काय करावे असा सवाल आता संतोष साळवे यांनी विचारला आहे. या संदर्भात आयसीआयसीआय बँकेचे रिजनल सेल्स प्रमुख रंजन खारोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या गोष्टीला नकार देत आम्ही केवळ कर्जदाराशी बोलू बँकेची धोरणे आम्हाला इतर कुणाला सांगता येत नाहीत असे सांगून या प्रकरणातून काढता पाय घेतला.