वसईत सध्या एका बांधकाम ठेकेदाराला अमानुष मारहाण करून थुंकी चाटायला लावल्याची घटना घडली. आरोपीने या संदर्भातला व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरु आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांनतर त्याला खुर्चीवर बसवून आरोपीने आपल्या पाया पडायला लावले. तसेच व्यापाऱ्याला स्वतःच्या हातावर थुंकून तीच थुंकी चाटायला लावली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना उमेलमान वसई परिसरात घडली आहे. तसेच मारहाण झालेला व्यक्ती हा पालघरचा बांधकाम ठेकेदार असून त्याचे नाव अनुप सिंग आहे. तो बांधकामाची छोटी मोठी कामे करतो.
वसईत राहणाऱ्या सूर्या आणि इतर तीन जणांनी व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील २५ हजार रुपये आणि मोबाईल चोरला आहे. या संदर्भात वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत.