भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळे बीसीसीआयकडून पृथ्वीला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेले औषध त्याला महागात पडल्याचे कारण समजते आहे. त्यामुळे त्याला १६ मार्च २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागेल. दरम्यान या आधी क्रिकेटविश्वात असंख्य खेळाडूंना डोपिंगचा सामना करावा लागला. चला तर मग जाणून घेऊयात या खेळाडूंनबाबत.
शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्न २००३ साली विश्वचषक स्पर्धेच्या काळात डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. दडपणाच्या काळात घेण्यात येणारी औषधे खाल्ल्यामुळे तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई झाली होती.
शोएब अख्तर आणि मोहम्मद असिफ
साल २००६ ला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद असिफ या दोघांना अनुक्रमे २ आणि १ वर्षाच्या बंदी घातली होती. हे दोघेही डोपिंगमध्ये चाचणीमध्ये दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांना चॅपियन्स ट्रॉफिच्या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.
मोहम्मद असिफ
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद असिफ याच्यावर २००९ ला १ वर्षाची आयपीएल बंदी घालण्यात आली होती. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात त्याची चाचणी करण्यात आली होती त्यामध्ये तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
उपुल थरंगा (श्रीलंका)
श्रीलंकेचा पहिला आंतराराष्ट्रीय क्रिकेटपटू उपुल थरंगा याला २०११ ला डोपिंगला सामोरे जावे लागले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेदरम्यान तो डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. त्याने सेवन केलेल्या औषधात अँटी डोपिंग समितीने बंदी घातलेली द्रव्ये होती.
प्रदीप सांगवान (भारत)
आयपीएलच्या २०१३ च्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळणारा वेगवान डावखुरा गोलंदाज प्रदीप सांगवान वरही निलंबनाची कारवाई झाली होती. डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर १८ महिन्याची बंदी घातली होती.
यासिर शाह (पाकिस्तान)
पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह २०१५ साली डोपिंगमध्ये दोषी आढळला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर शाहने लघवीचे नमुने तपासणीसाठी ICC कडे दिले होते, त्यात तो दोषी आढळला. त्यामुळे ३ महिन्यासाठी त्याचे निलंबन करण्यात आले होते.
आंद्रे रसल(वेस्ट इंडिज)
साल २०१७ मध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू आंद्रे रसल डोपिंगमध्ये दोषी आढळला होता. जमैका अँटी डोपिंग आयोगाने मार्च २०१७ मध्ये त्याला दोषी ठरवत वर्षभरासाठी त्याला निलंबित करण्यात आले होते.
मोहम्मद शेहझाद (अफगाणिस्तान)
अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शेहझाद याच्यावर २०१७ साली डोपिंगची कारवाई झाली होती. दुबईमध्ये एका स्पर्धेत खेळत असताना तो डोपिंगमध्ये दोषी ठरल्याने त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घातली होती.
युसूफ पठाण (भारत)
युसूफ पठाण २०१७ साली एका देशांतर्गत स्पर्धेत खेळत दोषी आढळला होता. त्याला दिलेल्या औषधांऐवजी चुकीचे औषध घेतल्याने त्याच्या शरीरात डोपिंग समितीने बंदी आणलेली द्रव्ये गेली होती. त्यामुळे त्याच्यावर ५ महिन्यांची बंदी घातली होती.