Ads
ब्लॉग्स

माळीण दुर्घटनेच्या आठवणीने आजही जीव तुटतो!

landslide-in-Malin
माळीण दुर्घटना
डेस्क बातमीदार

तुषार गोसावी – माळीण दुर्घटना…एक अशी दुर्घटना जिने संपूर्ण देश हळहळला.साखर झोपेत असलेले एक अख्खे गाव जमिनी खाली गाडले गेले. आणि त्याचे अस्तित्वच नाहीशे झाले ते कायमचेच. या घटनेत  151 जणांचा मृत्यू झाला.इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू होणे हि भीषण दुर्घटना होती. देशाच्या इतिहासात असे एखादे संपूर्ण गावच्या गावच जमिनीत गाडले गेल्याची ही पहिलीच घटना होती.अस म्हणतातना माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गाच्या प्रकोपा समोर त्याच काहीच चालत नाही, अशीच काहीशी घटना होती. 30 जुलै 2014 साली हि घटना घडली होती. आज या घटनेला 5 वर्ष पूर्ण झाली, यानिमित्त या घटनेत मृत पावलेल्यांना बातमीदार श्रद्धांजली व्यक्त करतो.

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील हे एक आदिवासी बहुल गाव होते. बारा ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर पासून 20 कि.मी तर पुण्यापासून 130 कि.मी अंतरावर असलेले हे माळीण गाव. जवळपास 700 लोकवस्ती असलेले आणि जवळपास 75 घरांचे हे गाव एका क्षणात भूगोलाच्या नकाशावरुन नाहीशे होऊन जमीन दोस्त झाले. सोबत अनेक निष्पाप जीव, प्राणी, गाई, म्हशी लहान बाळ केवळ काही क्षणात जमीनीशी एकरुप झाले. अनेक जिव गाड झोपेत होते, उद्याचा दिवस आपल्याला दिसणार नाही, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. आणि एक मोठा आवाज झाला आणि संपूर्ण एक गाव नाहीशे झाले ते कायमचे.

दुर्घटने नंतरची परिस्थिती

दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी चालकाला एक संपूर्ण गावच गाडले गेल्याचे लक्षात आले. यानंतर प्रशासनाला पाचारण करण्यात आले आणि मग सुरु झाले ते नागरिकांना वाचवण्याचे रेस्कू ऑपरेशन. मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा, चिखल, पावसाच्या बरसणाऱ्या कोसळधारा, बघणाऱ्या माणसांची गर्दी, खडतर रस्ता आणि गावात राहणाऱ्या नातलगांचा आक्रोश अशात सुरु झाले ते बचाव कार्य. सर्वप्रथम आजुबाजुचे लोक, एनडीआरएफ, पोलीस यांच्या मदतीने सुरवातीला 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले. वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने अँब्यूलंन्सलाही पोहोचण्यास अनेक अडथळे येत होते. अनेक अडथळे पार करत एनडीआरएफ चे 400 जवान, डॉक्टर आणि नर्सेस माळीण येथे दाखल झाले.

मन हेलावणारे दृश्य

जेसीपीच्या सहाय्याने अखेर मलबा काढायला सुरवात झाली. मात्र मलबा काढताना त्यातून बाहेर येत होते कोणाचे हात, कोणाचे पाय तर कोणाचे धड. मृत्यूच हे तांडव काळजाचे लचके तोडणार होत. एनडीआरएफ मात्र लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. मात्र हाती येत होते ते केवळ मृतदेह आणि अवयव. मात्र असे म्हणतातना देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे केवळ मांडण खाली अडकुन पडल्याने एका माय लेकराचा जीव वाचला. सुरवातीला बचावकार्याच या दुर्घटनेत 9 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र तब्बल 151 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तब्बल 125 तास म्हणजे 6 दिवस अहोरात्र बचाव कार्य सुरु होते. मात्र हाती येत होत्या त्या संसारातील वस्तु आणि मृतदेह. एकाच कुटूंबातील अनेक लोक या घटनेत मरण पावले.

बचावकार्य

335 अधिकारी, 2173 कर्मचारी, भिमाशकर साखर कारखाना, पुणे महापालिका, होमगार्ड कर्मचारी, 14 जेसीपी आणि 164 वाहन यांच्या मदतीने अहोरात्र 6 दिवस बचाव कार्य सुरू होत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी घटना स्थळाला भेट देत पाहणी केली.

 

सामुहीक अंत्यसंस्कार

या दुर्घटनेत जवळ जवळ 151 जणांवर मृत्यू ओढवला. या मृतदेहांवर सामुहीक अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांचे तर नातेवाईक आणि वारसांचा देखील पत्ता लागला नाही. 6 हजार लिटर रॉकेल आणि 12 टन लाकडे या अंत्यसंस्कारासाठी लागली. 30 जुलै 2014 साली झालेल्या या दुर्घटनेला आज पाच वर्ष पुर्ण झाली, मात्र घटनेच्या आठवणींनी आणि दृश्यांनी आज देखील काळजाचा ठोक चुकतो.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: