वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागा (आयसीयू) मधील फॉरसिलिंग छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाने आयसीयू मधील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र या दरम्यान रुग्णाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आता रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नालासोपाऱ्यातील विजय नगर परिसरात असलेल्या महापालिका रूग्णालयात सदरची घटना घडली आहे. आज सकाळी अचानक पालिका रुग्णालयातील आयसीयू विभागातील फॉरसिलिंग छत कोसळली. या घटनेनंतर रुग्ण व नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली.दरम्यान २०१८ मध्ये हे आयसीयू वार्ड चक्क पालिकेने पत्र्याच्या शेड खाली फॉरसिलिंग करून चालू केल होत. एका वर्षात या शेडला गळती लागल्याने या फॉरसिलिंगचा एक भाग खाली कोसळला आहे.
पालिका प्रशासनाने या दरम्यान आयसीयूमधील ७ ते ८ रुग्णांना जनरल विभागात हलवले होते. तसेच ज्या रुग्णाची तबियत अत्यंत बिकट होती त्या रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या या निर्णयाने नातेवाईक खूप संतापले आहेत. इतक्या बिकट अवस्थेत रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवताना त्यांचा जीव गेल्यास, याला जबाबदार कोण असा सवाल नातेवाईक विचारत आहेत.
२०१४ साली या रुग्णालयाची बांधणी करण्यात आली होती. अवघ्या पाच महिन्यातच रुग्णालयाची अशी अवस्था झाल्याने बांधकामावर संशय व्यक्त होतोय. बांधकामात निष्काळजीपणा हि झाला आहे. बांधकामा दरम्यान नीट लक्ष दिले गेले नाही आहे. तसेच सध्या आयसीयुतील रुग्णांना हलवण्यात येणार आहे. यावेळी रुग्ण दगावल्यास या घटनेस पालिका प्रशासन जबाबदार असेल असे, कॉंग्रेस पदाधिकारी रामदास कांबळी यांनी म्हटले.