Ads
ओपन मांईड ब्लॉग्स

वसईतील कॉंग्रेस नेता शिवसेनेच्या ‘टच’मध्ये !

डेस्क बातमीदार

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघासह विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारही याला अपवाद राहिलेले नाहीत. वसईतील कॉंग्रेसचा एक प्रतिष्ठित नेता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून अनुकूलता दिसत नसल्याने सध्या शिवसेनेच्या ‘टच’मध्ये असल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेसचा हा उमेदवार वसई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, मात्र कॉंग्रेस व बहुजन विकास आघाडीतील सख्य लक्षात घेता या ठिकाणी कॉंग्रेस या वेळी उमेदवार देणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दिला तरी त्याच्यामागे पाठबळ उभे करणार नाही, अशी चिंता आहे.

या मतदारसंघातून मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना २०१४ च्या निवडणुकीत  ९७ हजार २९१  मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या विवेक पंडित यांचा त्यांनी पराभव केला होता. विवेक पंडित हे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. विवेक पंडित यांना त्या वेळी ६५,३९५  मते मिळाली होती.  २०१४ मध्ये कॉंग्रेसकडून मायकल फुट्यार्डो हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यांना केवळ १६  हजार ४६७ मते मिळाली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसने अप्रत्यक्षरीत्या बहुजन विकास आघाडीच्याच पाठिशी बळ उभे केल्याने साहजिकच विजय हितेंद्र ठाकूर यांचा झाला. त्या वेळची खरी लढत हितेंद्र ठाकूर आणि विवेक पंडित यांच्यातच होती. आणि हा विजय हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेचा होता. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सर्वच पक्षांशी असलेले संबंध लक्षात घेता त्यांचा पराजय होणे शक्यच नव्हते. या भागात बहुजन विकास आघाडीचे मोठे प्रस्थ असले तरी विवेक पंडित यांची ताकदही कमी नाही. त्याआधी विवेक पंडित यांनीही आमदारकी भूषविली आहे, मात्र त्या वेळी विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढवली नव्हती. बहुजन विकास आघाडीचे त्या वेळी उमेदवार नारायण मानकर होेते. मात्र २०१४  आणि त्याआधीची निवडणूक ही राजकारणातील ‘अंडरस्टँडिंग’ मानली जात होती.

२०१४  पासून मात्र पालघरसह वसईचे वारे बदलले आहेत. २०१४ ला भाजपची आलेली लाट भाजपचा उत्साह वाढवणारी जशी ठरली तशी कॉंग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरली. त्यामुळे कॉंग्रेससह प्रादेशिक पक्षांना आपल्या अंगात बळ आणून कार्यरत होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याचीच प्रचिती पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने दाखवून दिली, तशी बहुजन विकास आघाडीनेही दाखवून दिली. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपने बहुजन विकास आघाडीसोबतची आपली मैत्री बाजूला सारून वसईची पायधूळ झाडली. वेळप्रसंगी बळीराम जाधव यांना तिसर्‍या क्रमांकावर ढकलून बहुजन विकास आघाडीला अप्रत्यक्ष का होईना ‘समज’ही दिली. भाजपची देशभरातील ताकद या पोटनिवडणुकीत कामाला आली. पण शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचा स्वाभिमान दुखावला. कॉंग्रेसने तर राजेंद्र गावित यांना भाजपला देऊन कच खाल्ली होती. या सगळ्याचे परिणाम त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर न होते तरच नवल. केवळ पक्षाचे नामधारी पदाधिकारी राहून काय करायचे? पक्षच पाठिशी ताकद उभी करणार नसेल तर उगाच पद मिरवायचे कशाला? अशी भावना कार्यकर्त्यांत आणि पदाधिकार्‍यांत निर्माण झाल्यानेच आगामी निवडणुकीच्या निमित्ताने का होईना विविध पक्षांच्या नेत्यांना पक्षांतराची दिशा खुणावू लागली आहे.

वसई-विरार शहरात बहुजन विकास आघाडीची ताकद मोठी आहे. भाजपचे पालघर सरचिटणीस राजन नाईक आणि जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी भाजपला सक्रिय केले आहे. शिवसेनेकडे मात्र सक्षम नेता नसल्याने कार्यकर्ते मरगळले आहेत. कॉंग्रेसचे नेते नामधारी आहेत. क्षमता असूनही पक्षाची ताकद मिळत नसल्याने कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतरासाठी चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा सध्या येथील राजकीय वर्तुळात आहे. नुकतीच वसईतील निवडणुकीसाठी इच्छुक नेत्याची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी तीन ते चार वेळा चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपनेही या नेत्याला आपल्याकडे येण्यासाठी ‘ऑफर’ दिली असल्याचे म्हटले जात आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत वसईतून विवेक पंडित यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने या नेत्याची शिवसेनेला पसंदी असल्याचे म्हटले जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत विवेक पंडित शिवसेना पुरस्कृत उमेदवार असले तरी भाजपवरील उट्टे काढण्यासाठी शिवसेना या वेळी येणार्‍या प्रत्येक ताकदवर नेत्याला पायघड्या अंथरण्यास मागे-पुढे पाहणार नाही. तसे झाले तर कॉंग्रेसचा हा नेता शिवसेनेकडून उमेदवारी मिळवू शकतो, अशी शक्यता या ठिकाणचे राजकीय विश्‍लेषक व्यक्त करत आहेत. भाजप-शिवसेनेच्या या साटमारीत बहुजन विकास आघाडीची कोंडी होऊ शकते. पण आमदार हितेंद्र ठाकूर यांची राजकीय खेळी आणि आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची होणारी-न होणारी युतीच या नेत्याची पुढील वाटचाल निश्‍चित करणारी ठरणार आहे.

शब्दांकन – संजय राणे

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: