वसई – विरार मध्ये काल रात्री पासून कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले. या पहिल्याच पावसाने वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याअसून, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे वसई-विरार महापालिकेचे सारेच दावे फोल ठरतानाचे दृश्य विविध परिसरात दिसून येत आहे.
गेल्यावर्षी वसई-विरार परिसरात पडलेल्या पावसाने जवळ-जवळ आठवडाभर जनजीवन विस्कळीत केल होते. या घडलेल्या घटनांचा धडा घेत यंदाच्या वर्षीही महापालिकेने पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेत योग्य उपाययोजना केल्याचा दावाही केला. यासाठी यंदाच्या वर्षी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून निरी आणि आयआयटी सारख्या अद्यावत तंत्रज्ञाना पाणी साठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणले गेले. मात्र पहिल्याच पावसात महापालिकेची अद्यावत यंत्रना व दावे तरंगतानां नागरिकांना दिसत आहे.
नालासोपाराच्या पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क, विजय नगर,आचोळे,अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भवन, धानीव बाग, सातिवली व पश्चिममेकडील निलेगाव, पाटणकर पार्क आदी परिसरात पाणी साठले आहे. तसेच विरारमधील फुलपाडा रोड, चंदनसार आदी भागात व वसईतील सनसिटी, एव्हरशाईन भागात पाणी साठले आहे. दरम्यान पावसाचा जोर पाहता आणखी काही वेळेनंतर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमची आपातकालीन यंत्रणा सज्ज आहे. ज्या परीसरात पाणी भरले आहे त्या परिसरातील पाणी काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.ज्या परिसरात पाणी साचले आहे त्या परीसरातील नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधावा. त्या परिसरात तातडीने यंत्रणा पुरविण्यात येईल.
बी जी पवार आयुक्त, वसई-विरार महानगर पालिका