प्रशांत गोमाणे : क्रांतिकारी संत व महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला असंख्य संत लाभले, मात्र या संताच्या विचारांना माणूस मात्र लाभलाच नाही.यातील काही निवडकच होते ज्यांनी या विचारांना आत्मसात केले आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला. साई आधार संस्थेचे संचालक विशाल परुळेकर यांनी शिवविचारांनी प्रेरित होऊन स्वत:ची एक रयत उभारली आहे.ही रयत उभारण्या पर्यतचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. मात्र या रयतेला पाहून नक्कीच शिवविचार किती प्रेरक याची जाणीव होते. या संस्थेला नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धान्य वाटप केले. या धान्य वाटपाने नक्कीच संस्थेला थोडाफार हातभार लाभला आहे.
संस्था स्थापण्याचा हेतू
शिवविचारांनी प्रेरित असलेले विशाल परुळेकर यांनी शिवरायांसारखीच रयत उभारली.आई-वडील नसल्यामुळे एकाकी पडलेल्या व काका-मामामुळे दुर्लक्षित झालेल्या परिस्थितीत आपल्या पोटा पाण्याची भूक भागवण्यासाठी सिग्नलवर भिका मागणाऱ्या मुला-मुलींना एकत्रित केले. हि मुले सिग्नलवरच्या वातावरणात गुन्हेगारी क्षेत्राकडेही वळू शकतात.मात्र त्यांचे हे भविष्य तसे ना घडावे यासाठी त्यांना जगण्याच्या उमेदीसह शिक्षणाचा हक्क देऊन त्यांचे संगोपन करून त्यांनी ही रयत उभारली आहे. मात्र अशाप्रकारे काळानुसार बदललेल्या रयतेला पाहून नक्कीच शिवविचार किती प्रेरक होते याचा भास होत आहे.
विशाल परुळेकर यांची साई आधार हि संस्था विरारच्या भाताने, कट्याचा पाटा येथे उभारण्यात आली आहे. या संस्थेत संध्या मुले-मुली अशी एकूण ४० जण आहेत. हा एका असा परीवार आहे जो पूर्णपणे शिवविचारांनी प्रेरक बनलाय. तसेच परुळेकर म्हणतात कि, साई आधार हे एक घर नसुन, जे वंचित आहेत, ज्यांना घर नाहीत,ज्यांचे आई-वडिल नसताना काका-मामांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते बेघर झालेत त्यांच्या हक्काचे हे घर असल्याचे ते म्हणतात.
संस्थेचे मंत्रीमंडळ
राज्याचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र हा विस्तार गोंधळात सापडलेला असतानाच साई आधार संस्थेचा मंत्रीमंडळ पाहून अचंबित व्हायला होते. विशाल परुळेकर यांनी इतकी मोठी रयत सांभाळण्यासाठी संस्थेतच मंत्रीमंडळाचा विस्तार केलाय. संस्थेच्या मंत्री मंडळात एक मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, संरक्षण मंत्री आहेत. हि सर्व पदे या संस्थेतील मुलेच सांभाळतात. जसा मुख्यमंत्री आहे जो दहावीचा मुलगा आहे. तो मुळचा यवतमाळचा आहे. जो पूर्ण मुलांची काळजी घेणे त्यांना हवे ते देण या सर्व गोष्टी पाहतो. तसेच आरोग्य मंत्री आहेत जे मुलांचे आरोग्य सांभाळण्याचे कार्य करतात. तसेच एक पुरोहित आहेत.जे शिवरायांच्या आरत्या, हरिपाठ शिकवतात. अशा प्रकारे सर्व मंत्री आपले कार्य चोख बजावत आहेत.
संस्थेचा गाडा असा हाकला जातो
विशेष म्हणजे इतकी मोठी रयत उभारून त्यांचा योग्य सांभाळ करणे. त्यांना हवे ते देण हे आजच्या महागाईच्या काळात अशक्यप्रायच आहे. मात्र या बाबत ते म्हणतात कि, या परिवारात कोणीही फुकटचे खात नाही. कचरा काढण, बागेला पाणी घालणे, शेणाच्या गोवऱ्या करणे, कांदा निवडणे, भाजा चिरने अशी सर्वच कामे येथील मुले-मुली करतात.
शिवविचारक विशाल परुळेकर हे कार्य गेल्या 10 वर्षापासून करत आहेत.या कार्यकाळात आतापर्यत ७० मुले शिकून बाहेर पडली असून ती मुले आता विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. त्यांच्या संस्थेतील एका मुलाने सुप्रसिद्ध संभाजी या मालिकेत काम केले आहे. तसेच काही मुले प्रोफेशनली कीर्तन करतायत. काही पिशव्या करून विकणारी टीम आहे. त्या पिशव्या विकून ते दोन पैसे कमवतात.
शेतकऱ्यांना मानसिक आधार देणे
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न बिकट होत चाललाय. या आत्महत्यांवर अंकुश घालण्यासाठी साई आधार संस्थेतील मुले भजन-पथनाट्याद्वारे शिवविचार मांडून शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. आत्महत्या हा पर्याय नाही. तू आत्महत्या केल्यास तुमची मुले बेघर होतील. तसेच एक ना एक दिवशी कर्जमाफी होईल धीर धरा अशा प्रकारचे आवाहन हि मुले करतात.
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या मुलांचा सांभाळ करणे व त्यांचे संगोपन करणे तितकस सोप्पे नाही आहे. मात्र ज्याचा मनी शिव विचार असतील तो नक्कीच अशी रयत उभारून समाजाचा उद्धार करेल, इतक मात्र नक्कीच!