वसई : भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभरात निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमविरोधात निदर्शने करण्यात आली. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह नालासोपाऱ्यात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनचा विरोध करत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणीसुद्धा वंचित आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीसाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन केले.तसेच यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. नालासोपाराच्या संयुक्त नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रॅली काढून निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा देऊन घंटानाद केला. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचे दहन केले