आज १७ जून आणि हा दिवस स्वराज्याची ज्योत ज्या माऊलींनी आपल्या सुर्यासमान असणाऱ्या मुलाच्या मनात चेतवली त्या राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त ‘बातमीदार’ तर्फे विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला होता. त्याकाळच्या प्रथा परंपरांनुसार बाल वयातच जिजाऊंचे लग्न शहाजी राजे भोसले यांच्याशी १६०५ साली लावून दिले होते. शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शहाजी राज्यांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. त्यांच्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी केवळ कथाच नाही सांगितल्या, तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे धडेही शिवाजीराज्यांना दिले. तसेच जिजाबाई या फक्त आदर्श नव्हत्या तर त्या चांगल्या शासक आणि पत्नी ही होत्या.
स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीती शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस शिवाजी राज्यांना दिले. शिवाजी राजेंना देण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर जिजाऊंनी स्वत: बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले होते.