येत्या 12 जुलै 2019 ला यंदाची आषाढी एकादशी पार पडणार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि लगतच्या भागातून वारकारी भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा महाराष्ट्र परिवहन विभागाने सुमारे 3724 विशेष एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी बसच्या स्वच्छ, आकर्षक आणि सुस्थितीत सज्ज ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये नव्या माईल्ड स्टीलच्या तब्बल 1200 गाड्य असतील अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. 10 ते 16 जुलै दरम्यान एसटी अहोरात्र भाविकांना सेवा देणार आहे. यासाठी 5 हजार वाहक, चालक, अधिकारी आणि इतर कर्मचारी सेवेसाठी सज्ज ठेवले जाणार आहेत.
पंढरपूर यात्रेसाठी औरंगाबादमध्ये 1097, मुंबई 212, नागपूर 110,पुणे 1080, नाशिक 692, अमरावतीमध्ये 533 जादा गाड्या चालवल्या जाणार आहेत. पंढरपूरात या काळात 3 तात्पुरती बस स्थानकं देखील उभरण्यात येणार आहेत.
परतीच्या प्रवाशाची तिकिट बुकिंग
वारकरी दिंडीच्या माध्यमातून चालत पंढरपुरात पोहचतात मात्र परतीच्या वेळेस वाहतुकीसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे 10% तिकिटांचं बुकिंग आगाऊ स्वरूपात मंडळाच्या ऑनलाईन बुकिंग वेबसाईटवर खुलं करण्यात आले आहे.