अर्नाळा युवा संस्था आणि अपंग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अर्नाळ्यातील गांधी स्मारकात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहरातील विविध उपस्थिती पाहुण्यांच्या हस्ते अर्नाळा ग्रामपंचायतीमधील स्वछता विभागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अर्नाळ्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू विनायक भोईर, सुप्रसिद्ध डॉ. मीनल नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक स्टीफन डिमेलो, अर्नाळा युवा संस्थेचे अध्यक्ष शमीम खान, नितीन वैती, अविनाश तांडेल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्मारक परिसरात गुलाब, सदाफुली, वड, पिंपळ, बदाम, साग, बकुळ, गुलमोहर, आदी झाडांची उपस्थित नागरिक आणि लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला दिलीप बेनबन्सी, संदेश आबा, विकास सालियन, देवेंद्र वैती, जमीर चाऊस यांचे सहकार्य लाभले.
पर्यावरणाची घेतली शपथ
अनेकदा झाड लावण्यानंतर ते दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे पाण्याअभावी अनेकदा झाडे सुकून जातात. म्हणून आपण लावलेल्या झाडाचे संगोपन करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, यासाठी ‘माझा अर्नाळा गाव निसर्गरम्य गाव’ अशी शपथ घेऊन, जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी इतरांना प्रोत्साहन देऊ असा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला
दरम्यान विविध मान्यवरांनी पर्यावरण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. जगभर बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे पुढील १० वर्षात जागतिक तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल”, असे डॉ. मीनल नाईक म्हणाल्या आहेत. तसेच वृक्षसंपदा जोपासण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत असेही त्या म्हणाल्या.
नितीन वैती यावेळी म्हणाले कि, एकदा सहज दुपारी मित्रांसोबत महात्मा गांधी स्मारकाकडे गेल्यावर तेथील अस्वछता पाहून मनाला फार वाईट वाटले. त्यामुळे आपणच पुढाकार घ्यावा या हेतूने गेली तीन महिने दररोज या ठिकाणी स्वेच्छेने सफाई सेवा करत आहोत.
गांधी स्मारकात स्वछता आणि पाणी पुरवठ्यासाठी नितीन वैती आणि अविनाश तांडेल यांचा मित्र परिवार नि:स्वार्थ मेहनत करत आहेत. अर्नाळ्यात लोकोपयोगी कामांसाठी युवा संस्था नेहमीच पुढाकार घेईल, ग्रामस्थांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शमीम खान यांनी यावेळी केले.