केरळमध्ये १० जूनला पावसाचे आगमन झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याच्या बातम्यांचा पाऊस विविध वृत्तपत्रात पडत असतानाच आज सकाळी अचानक सिंधुर्दुर्गात पावसाने हजेरी लावली. मात्र या पहिल्याच पावसाने चौपदरीकरण कामांची दाणादाण उडवली. यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
कणकवली शहरातील वागदे परिसरातील रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. त्याचबरोबर बस स्थानक परिसरात रस्ताच खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तर अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. हायवेलगतच्या नागरिकांच्या घरात आणि हॉटेलमध्येही पाणी गेले आहे.
दरम्यान पावसापूर्वी महामार्ग चौपदरीकरणअंतर्गत पाणी निचरा होण्याची सर्व कामे करावीत, असे निर्देश लोकप्रतिनिधींनी दिले असतानाचा देखील. हि कामे झटकून लोकप्रतिनिधींनी पाऊस आल्यावर काम करण्याची वात पाहत असल्याची चित्र दिसले. तसेच मुजोर हायवे ठेकेदारांनी यातील कोणतीही कामे केली नसल्याचा फटका वाहन चालक आणि सर्वसामान्यांना बसला आहे.
पहिल्याच व निव्वळ तासाभरापुरत्या पावसाने चौपदरीकरण कामांची पोलखोल व प्रशासनाच्या कामांचा रिझल्ट लागल्यामुळे पुढील पावसाला कसा काढावा असा प्रश्न आता कोकणवासीय उपस्थित करत आहेत.
आकेरीत झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली
सावंतवाडीत वारा आणि पाऊस जोरदार सुरू झाल्याने मुंबई-गोवा मार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात मोठे झाड कोसळले. हे झाड जुने असल्याने ते कोसळल्याचे निदर्शनास येते आहे. झाड कोसळल्याने सावंतवाडीहून कुडाळकडे जाणारी वाहतूक व कुडाळहून सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. काही वाहने आता आकेरी तिठ्यावरुन झाराप-पत्रादेवी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ होत कुडाळच्या दिशेने जात होती.