Ads
ब्लॉग्स

बविआच्या गडातच रिक्षा पलटी !!!

डेस्क desk team

पोट निवडणुकीच्या पराभवानंतर बविआ ने चिंतन केल्याचे दिसून आले नाही. कारण ज्या पद्धतीने आताचा पराभव झाला त्यात जुनीच कहाणी पाहायला मिळाली. पोटनिवडणुकीत मिळालेली प्रसिद्धी पाहता आणि महाआघाडीची साथ पाहता बविआ एकहाती हि जागा जिंकेले असे राजकीय समीकरण बांधण्यात आले होते. पण तसे न होता शिवसेनेला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. बविआच्या मताधिक्यात वाढ पाहायला मिळाली पण त्यात महाआघाडीचा वाट लक्षात घेता हि नक्की वाढ म्हणावी कि नाही हा प्रश्नच आहे.

नालासोपारा मतदारसंघ बविआ चा ‘गड’. 23 मे च्या निकालानंतर बविआ च्या मुख्य कार्यालयात शुकशुकाट! (एरवी उमेदवार जिंकला असता तर अनेक जण, अगदी काही पत्रकार देखील आपले योगदान कसे आणि किती हे सांगण्यास आवर्जून दाखल झाले असते). बविआचा गड का पडला याचे चिंतन मनन ते करतीलच. मात्र वाऱ्यावरची कुजबुज (कोणी मानो अथवा न मानो) काही वेगळीच आहे. मागील पाच सात वर्षात बविआ नेत्यांचा लोकसंपर्क कमीकमी होऊ लागला. नगरसेवकामधील अंतर्गत कलगीतुरा मागील पाच वर्षात वाढू लागला. नगरसेवक आपले मुख्य कार्य न करता इतर अर्थपूर्ण कार्यात गुंतू लागला.

हितेंद्र ठाकूर यांचे स्वताचे असे एक वलय या तालुक्यात निश्चित आहे, आणि त्यांना जनाधार ही आहे. मात्र तरुण आमदार क्षितिज ठाकूर यांचा लोकसंपर्क (त्यांच्या कार्यालयातून नव्हे) कुठे तरी कमी पडतोय, त्यांचा कार्यकर्त्याबरोबरचा संवादच नाही. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना न मिळणारा सम्मान. आम्हीच येथील भाग्यविधाते ही अहंची बाधा. नवीन ठेकेदार लॉबीत जुनी ठेकेदार लॉबीला काम मिळत नसल्याने नाराज. तसेच बविआच्या विकासकांच्या फाईलना महापालिकेची सहज न मिळणारी मंजुरी आणि तेव्हाच इतर विरोधकांच्या फाईल्स अगदी सहजतेने मंजूर होताना हताश झालेली त्यांचीच बिल्डर लॉबी. हे सर्व असतानाही प्रत्येक जणाने निवडणुकीत पक्षकार्य केले,पण वाढलेले नवमतदारांचे मोदीप्रेम, गुजराथी मारवाडी समाज तसेच शिवसेनेच्या मागे राहिलेला कोकणी-मराठी मतदार यांनी बविआला गडात धोबीपछाड दिले. बविआच्याच लोकांनी बांधलेल्या अनधिकृत चाळीत आलेल्या परप्रांतीयानी बविआविरुद्ध मतदान केले. बविआ ने स्थानिक पातळीवर अनेक विकासकामे केली पण त्या कामांची पोच पावती त्यांना या निवडणुकीत मिळाली नाही.
बविआचे दुसऱ्या फळीतील बहुतेक नेते आज सधन आणि आर्थिक सुबत्तेत आहेत, त्यांच्यातील किती जण बविआला जडणघडणीत 100% प्रामाणिक प्रयत्न देतात यावर ही प्रश्नचिन्हच. बरे बविआचे शीर्ष नेतृत्वास आपल्या उणीवा, चूका दाखवून देण्याचे धाडस कुणाकडेच नाहीच आणि ते ऐकून घेतले जाईल याची शाश्वती देखील नाही. म्हणून जसे चाललेय ते चालू दे हीच सर्वांची भूमिका. केंद्रात लोकांनी मोदींना कौल दिला, ते आता विधानसभेत वेगळ्या विचारसरणीत असतील आणि राज्यात आपल्याला मतदान करतील अशी स्वताची समजून न काढता बविआ ने जोरात कामास लागण्याची गरज आहे. बविआला काळाची गरज ओळखून तात्काळ आपले गड बुरुज अभेद्य कसे राहतील याची व्यूहरचना करावी लागेल.बविआ सत्तेत राहावी ही आमची प्रामाणिक ईच्छा..म्हणूनच हा प्रपंच.

संजय राणे – प्रत्रकार

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: