जैवविविधतेचे संवर्धन केल्या शिवाय शाश्वत विकास शक्यच नाही, असे अभ्यासकांनी किती वेळाही अधोरेखित केले तरी विकासाच्या मागे धावणाऱ्या माणसाला आपल्या सभोवताली असलेली जीवसृष्टी आणि वनसंपदेचा विसर पडलाय. त्यामुळे या जैवविविधतेचे महत्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली.
भारतामध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पती वैविध्यपूर्ण असून हे जीव आपले वेगळेपण जपून आहेत. मात्र बदलत्या निसर्गचक्रामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे जीव आणि त्यांचे अधिवास धोक्यात आलेय. त्यामुळे अशा जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करणे आता काळाची गरज बनलीय. यासाठी विविध उपक्रम राबवून याला सजीत्व देण्याचा काही मंडळी प्रयत्न करित आहेत. मात्र आता जैवविविधता टिकवण्यासाठी निव्वळ काही मंडळीचाच नाही तर संपूर्ण मानवमात्राची गरज आह्रे.
जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. त्यामुळे जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे. विविध कीटकांचे, फळांचे, फुलांचे, पक्षांचे नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत ! या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा जैवविविधता दिवस (बायोडायव्हर्सिटी डे) साजरा होतो.
एकविसाव्या शतकात जैवसंपदेशी संबंधित उद्योग एकूण अर्थव्यवहाराच्या ४० टक्के उलाढाल घडवतील असा अंदाज आहे. शाश्वंत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले नाही, तर भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे, त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यचक गोष्टींना कसा फायदा होतो, या बाबींचे विश्ले्षण केल्यासच कळून येईल.
जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्याा प्रदेशांपैकी भारत एक आहे. थारसारखा वाळवंटी प्रदेश, हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या सूचिपर्णी वृक्षांची जंगले, तसेच नेपाळच्या सीमेजवळील तराईचे प्रदेश आणि ईशान्येकडील ब्रह्मदेशापर्यंत पसरलेली निबीड अरण्ये, सागराजवळील खारफुटीची राने आणि अंदमान-निकोबार, लक्षद्विपसारखी द्विपकल्पे यांसारख्या बहुविध परिसंस्थांमुळे भारतात विपुल जैवसंपदा आढळून येते. पश्चिवमघाट किंवा सह्याद्रीच्या डोंगरांगा यापैकीच एक. सागराचे सान्निध्य, कमी-जास्त पर्जन्यमान, मृदाप्रकार, भूशास्त्रीय स्तर यांचा वनांवर झालेला परिणाम व त्यामुळे निर्माण झालेली विविधता याचा एकत्रित परिणाम म्हणून येथे अधिवासांची विविधता आहे. घाटमाथ्यांवरील जांभ्याची पठारे किंवा सडे ही अशीच एक नाजूक परिसंस्था आहे. “सिरोपेजीया’सारख्या दुर्मिळ वनस्पती प्रजाती, काही विशिष्ट बेडकांच्या प्रजोत्पादनाची ठिकाणे अशा सड्यांवर आढळून येतात. दुर्दैवाने अशी पठारे लोह, बॉक्साचईटसारख्या खनिजसंपत्तीने विपुल असल्याने खाणींची शिकार होत आहेत.
भारतात पिकांच्या, पाळीव प्राण्यांच्या हजारो जाती आढळून येतात. त्या काही अचानक किंवा अपोआप तयार झाल्या नाहीत. वर्षानुवर्षे स्थानिक जमातींनी किंवा शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाला अनुकूल जाती निवडून त्यांची प्रयत्नपूर्वक जोपासना केली. म्हणूनच हा जैवविविधतेचा फुलोरा फुलला. सद्यःपरिस्थितीत केवळ उत्पादनवाढ हे एकच ध्येय समोर ठेवल्याने इतर घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे.