मुंबई – गणेशोत्सवाआधीच बाप्पा चाकरमान्यांना पावले आहेत. कारण यंदा गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्यांची घोषणा केली. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांचि गैरसोय होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल या स्थानकांतून या विशेष गाड्या धावणार आहेत. २५ मे पासून या विशेष ट्रेनसाठी आरक्षण खुले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलीय .
गणेशोत्सवात २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान मुंबई ते सावंतवाडी अशा २६ फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. या दरम्यान ट्रेन क्रमांक ०१००१ ही मुंबई ते सावंतवाडी धावणारी गाडी रात्री १२.२० वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी २.१० वाजता पोहोचेल.तसेच ०१००२ ही ट्रेन परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सुटणार असून मुंबईला पहाटे ३.४० वाजता पोहोचेल.
मुंबई ते सावंतवाडीच्या १२ फेऱ्या २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवार आणि शनिवार धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१००७ ही मुंबई ते सावंतवाडी गाडी दर गुरुवारी आणि शनिवारी रात्री १२.२० वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी २.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी दुपारी ३ वाजता सुटणार असून मुंबईत पहाटे ३.४० वाजता पोहचेल.
तसेच मुंबई-रत्नागिरी-पनवेल अशा ४० फेऱ्या मध्य रेल्वेने घेतल्या आहेत. या २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान असणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०३३ ही मुंबई-रत्नागिरी गाडी सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल, तर ती रत्नागिरीला रात्री १० वाजता पोहचेल. याच दिवशी परतीचा प्रवास रत्नागिरीहून रात्री १०.५० वाजता सुरू होईल.
२९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान पनवेल-सावंतवाडी-मुंबई अशा ४० फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०३५ ही गाडी पनवेल येथून स. ७.५० वाजता सुटणार असून सावंतवाडी येथे रात्री १० वाजता पोहोचेल. सावंतवाडी येथून रात्री ११ वा. परतीचा प्रवास सुरू होणार असून, मुंबईत दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेरणे (६ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप (६ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल (८ फेऱ्या), पनवेल-सावंतवाडी (८ फेऱ्या), पनवेल-थिवीम (८ फेऱ्या), पुणे-रत्नागिरी व्हाया कर्जत-पनवेल (सहा फेऱ्या), पुणे-करमाळी (२ फेऱ्या) आणि पनवेल-सावंतवाडी या विशेष फेऱ्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.