प्रशांत गोमाणे – पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या नरपड गावात राहणाऱ्या पॅरा अथलीट कब्बडीपटू सचिन तांडेलने श्रीलंकेत आपल्या संघासह भारताचा झेंडा डोलाने फडकवलाय. कोलंबोत आयोजित करण्यात आलेल्या पॅरा अथलीट कब्बडी स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले. या विजेत्या संघात महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनेने मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीवरून सध्या सर्वच स्थरावरून त्याचे कौतुक होतेय. मात्र या स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास खूपच थक्क करणारा आहे.
- श्रीलंकेत पार पडलेल्या पॅरा अथलीट कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले? त्याबाबद्दल काय सांगशील आणि कशाप्रकारे जिल्ह्यात तुझे स्वागत करण्यात आले.
श्रीलंकेत पॅरा अथलीट कबड्डी स्पर्धेत आम्ही विजेतेपद पटकावले. आमच्या या कामगिरीवर संपूर्ण भारतातून आमच कौतुक होतेय. माझासाठी ही खूप महत्वपूर्ण स्पर्धा होती. कारण मी प्रथमच आंतरराष्टीय स्पर्धा खेळलो आणि आम्ही जिंकलो. ज्यावेळी आम्ही भारतात परतलो त्यावेळी आमच स्वागत करण्यात आले. माझा जिल्ह्याने व मातंग समाजाने माझे जंगी स्वागत केले, रॅलीही काढण्यात आली. जिल्हावासीयांच्या या स्वागतामुळे मी त्यांचा आभारी आहे.
- या स्पर्धेत कशाप्रकारे तुम्हाला विजेतेपद पटकावता आले ? व तुमच्यासमोर आव्हाने किती होती ?
श्रीलंकेच्या कोलंबोत आयोजित करण्यात आलेल्या तिसरी एटीएफसी पॅरा अथलीट कबड्डी स्पर्धेत भारतासह चार देशांचा सहभाग होता. या स्पर्धेत अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत रंगला होता. यावेळी दोन्ही संघात अटीतटीची लढत होती. मात्र आम्ही शेवटच्या क्षणी उत्कृष्ट कामगिरी करून विजय मिळवला.
- महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तुम्ही केलत ? त्याबाबत काय सांगाल? तुमच्यावर काही दडपण होते का ?
महाराष्ट्रातून मी एकमेव असा खेळाडू ज्याची निवड या स्पर्धेसाठी झाली होती. त्यामुळे माझावर एक जबाबदारी होती. त्याच जबाबदारीची जाणीव ठेवत मी खेळलो आणि आम्ही विजेतपद पटकावण्यात यशस्वी ठरलो.
- कबड्डी क्षेत्रात तू कसा आलास ? या क्षेत्रात येताना तुझासमोर किती आव्हाने होती?
कबड्डी क्षेत्रात माझासारख्या तरुणाने यावे अशी घरची परिस्थिती नव्हती. कारण वडील नसल्याने आमच्या पाचही भावडांचा सांभाळ आईनेच केला. तिने घरकाम, कडईकाम करून आम्हाला मोठे केल. तीच्यासाठी काही कराव या उद्देशाने मी कब्बडीकडे वळलो. त्यांनतर शाळेत असताना पीटीचे शिरसाठ सर यांनी कब्बडीचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कब्बडी सामने खेळून शाळेला असंख्य बक्षिसे मिळवून दिली.
बजरंग व्यायाम मंदिराकडून यांनतर मी खेळाला सुरुवात केली. यात मला महर्षी राजेंद्र अंबीरे, किशोर पाटील, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कब्बड्डी शिकत गेलो. माझा खेळ पाहून ओम साई नरपड संघाने मला संघात घेतले. या संघामधून खेळायला लागल्यानंतर माझी श्रीलंकेच्या स्पर्धेसाठी निवड झाली.
कब्बडी क्षेत्रात येताना असंख्य आव्हाने पुढे होती, परिस्थिती अत्यंत बिकट होती. घरातुनही कब्बडीला विरोध होता. मात्र मी खेळत गेलो. तसेच मी मांगेला समाजाचा असल्या कारणाने बोटीवर जाऊन आमचा व्यवसाय बघायचो. त्यांनतर मिळेल त्या वेळेत मी सराव करायचो. श्रीलंकेत जाऊन स्पर्धा खेळायलाही माझाकडे पैसे नव्हते. मात्र ओम साई नरपड संघाने विजेतपद मिळवलेल्या रक्कमेतून, मांगेला समाजाने व गावातील काही प्रतिष्टीत व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे मला ही स्पर्धा खेळता आली.
- देशात सध्या प्रो कबड्डीचे वारे आहे, यामुळे देशात कबड्डीला वाव मिळतोय? या धर्तीवर पॅरा अथलीट सारख्या कबड्डीपटूंनाही वाव मिळण्यासाठी काय करावे असे तुला वाटते?’
प्रो कब्बडी सारख्या स्पर्धामुळे जसे इतर कब्बडीपटूची करियर घडलं. तसेच अपंग, दिव्यांग खेळाडूंसाठीही स्पर्धा भराव्यात. जेणेकरून त्यांनाही करियरचा नवीन मार्ग मिळेल.
- या विजेतेपदा आधी कुठल्या कुठल्या स्पर्धा संघाने जिंकल्या आहेत?
मंगलोरमध्ये याआधी आमची स्पर्धा होती. 14 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या संघातून खेळलो. अंतिम सामन्यात आमचा कर्नाटक विरुद्ध सामना रंगला होता. या सामन्यात आमचा पराभव झाला आणि आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सामन्यात मला उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला होता.
- तुझं पुढचे ध्येय काय असेल ?
श्रीलंकेत पार पडलेल्या स्पर्धेतील कामगिरीवर माझ आशिया चॅम्पियनशीपसाठी निवड झालीय. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धेसाठी मी पूर्ण ताकदीने सराव करणारा असून भारताला पुन्हा विजेतपद मिळवून देणार.