पालघर – पालघर लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आजपासून अवघा आठवडा उरला असतानाच, ९५ हजार दुबार मतदारांचे मतदान केंद्र, बोगस मतदानाची माहिती व उशिरापर्यंत काही मतदार केंद्रावर मतदान सुरु असल्याची माहिती मिळवण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बळीराम जाधव यांनी नमुना क्रमांक ‘१७-अ’च्या प्रती मिळावे, यासाठी पालघर निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज केलाय. त्याच्या या अर्जावर आता निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात याकडे सार्यांचे लक्ष लागून आहे.
विशेष म्हणजे शिवसेना तसेच बहुजन विकास आघाडी या पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दुबार मतदाराची तक्रार अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे दोन्ही पक्षाना बोगस मतदान होण्याची शक्यता जाणवत होती. तसेच पालघर लोकसभा क्षेत्रातील दुबार मतदार यादीतील नावाचा आकडा पाहता. जर दुबार मतदान झाले असल्यास हा आकडा नक्कीच एखाद्या पक्षासाठी विजयाचा टर्निंग पॉईंट ठरू शकण्याची भीती नागरीकांमधून व्यक्त होतेय.
पालघर लोकसभा मतदारसंघात काही राजकीय मंडळींनी मिळून इतरत्र अशा दुबार नावांवर मतदान करून घेतल्याची शक्यता बळीराम जाधव यांनी व्यक्त केलीय. त्यामुळे याबाबतचा पूर्ण तपशील मिळण्यासाठी, मतदारांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले नाव, केलेली स्वाक्षरी आणि ओळखपत्राचा पुरावा, याची माहिती असणारा नमुना अर्ज ‘१७-’ मिळावी तसेच मतदान केंद्रांवरील मतदारांची यादी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या डायरीची प्रत मिळावी, अशी मागणी पालघरच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केलीय.दुबार मतदार यादीतील नावाच्या घोळामुळे बळीराम जाधव यांनी दाखल केलेल्या या अर्जावर निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मतदार यादीत दुबार नाव असलेली क्षेत्र
- पालघर क्षेत्र : २० हजार
- डहाणू क्षेत्र १३ हजार
- बोईसर क्षेत्र : १७ हजार
- विक्रमगड क्षेत्र १२ हजार
- नालासोपारा क्षेत्र : २३ हजार
- वसई क्षेत्र : ८ हजार