Ads
ब्लॉग्स

निर्णय….

डेस्क desk team
निर्णय न घेता येणं यासारखा दोष नाही तुमच्यात…उशिरा दिलेला निर्णय हा न दिलेल्या निर्णयाप्रमाणेच असतो…अशी सूचक वाक्य मनात फिरत असताना शेवटी निर्णय द्यावाच लागला, आईसाठी घ्यावाच लागला. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, जगात सगळे  मिळेल आई वडील कुठे मिळणार?

पहिल्यांदा मला जेव्हा समजले, आईला यकृताची गरज आहे. आणि ते तिला कोणीतरी दिले पाहिजे. तेव्हा मनाने लगेच कौल दिला, ‘नाही बाबा आपले यकृत असे दुसऱ्याला कोण देईल”., भले ते आई वडील असतील. मध्ये बराच काळ लोटला, “द्वीधा मनस्थिती” “आपल्या यकृताचा अर्धा भाग आईला देणं, म्हणजे आपल्या आयुष्याची फक्त अर्धी हमी देण्यासारखं आहे”.

 भूत, वर्तमान, भविष्य सगळे चित्र नजरेसमोर दाहकपणे उभे राहिले, भूतकाळ होता आईने जन्म दिला, वर्तमान आईला यकृताची गरज आहे. आणि भविष्य ज्यासाठी प्रत्येक जन झटत असतो, सध्या तरी भविष्य अधांतरीच…” घरी सगळ्यांना अंतिम निर्णय द्यायची वेळ आली, मग अंतर्मनाचा कौल मिळाला, आपण या जगात आलो ते आईचे पोट फाडूनच, मग आईसाठी मी पोट फाडले तर नवल ते काय? भविष्याची चिंता करता करता मी वर्तमान हातून घालवत होते, आज आईला यकृत दिले तर आई जगेल, याच्यापेक्षा आनंदाचे काय असू शकते. भविष्य काय आहे हे आपल्याला माहित नाही आणि त्या भविष्यासाठी मी आईला यकृत देण्याचा निर्णय टाळत होते, आज कामासाठी बाहेर गेलेला माणूस घरी येईल की नाही याची शास्वती नाही, आणि मी भविष्याचा विचार करत होते, “आयुष्य बेभरवशाचे असताना…”

निर्णय घेताना खुपदा निर्णय बदलला, एक मन करत होते यकृत दे, एक मन करत होते यकृत नको देऊ. यावर आईने क्षणाचाही विलंब न लावता लगेच विचारले, ‘अग तुझे निर्णय किती वेळा बदलतात’, मीही लगेच उच्चारले, “अग यकृत पाकिटात नाही, पोटात असतं, पाकिटातले पैसे पण माणूस सहज देत नाही, मला तर तुला पोट फाडून यकृत द्यायचेय, विचार तर करावाच लागणार ना?  एखाद्याला काळीज देण्याचा निर्णय घेताना त्या माणसाला काळीजच असले पाहिजे.

माहित नाही मला मी आईला यकृत दान केल्यावर पुढचे माझे आयुष्य किती असेल…? ज्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळत नाही त्याची उत्तरं येणारा काळ देत असतो…कदाचित काळाच्या ओघात माझे प्रश्नही बदलतील…माझ्या पुढील भविष्याचा निर्णय मात्र काळावर सोडला…

सरिता कोकरे

सरिता कोकरे

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: