मुंबई – महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2160 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. केंद्राने आतापर्यंत एकूण 4248.59 कोटी रुपये दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अतिरिक्त मदतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच निवडणूक आयोगाला राज्यातील दुष्काळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचे आवाहन केले होते. यानंतर केंद्राने ही मदत जाहीर केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
मराठवाड्यातील 33 शहरांमध्ये पाणीबाणी
मराठवाड्यातील बहुतांश शहरे तहानलेली आहेत. तब्बल 33 शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 13 शहरे टँकरवर अवलंबून आहेत. खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री या शहरांना पाणी पुरवणारे प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. जालना जिल्ह्यात घनसावंगी, भोकरदनमध्ये तसेच हिंगोलीतील सेनगाव नांदेड जिल्ह्यात किनवट, उमरी, बीड जिल्ह्यात वडवणी, पाटोदा, शिरूर कासार, आष्टी, लातूर जिल्ह्यात औसा अशा एकूण 13 ठिकाणी टँकरच्या भरवशावर नागरिकांना राहावे लागत आहे.
Central government provided additional Rs 2160 crore for drought relief: Maharashtra CMO
Read @ANI Story | https://t.co/2jqfvUqjIY pic.twitter.com/QbZvQPc0wb
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2019
तत्पूर्वी, 30 एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत मदत पोहोचवण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याचे आवाहन केले होते. यानंतर आयोगाने मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करत, या कामांचा राजकीय लाभासाठी प्रचार न करण्याची अट घालत आचारसंहिता शिथिल केली होती.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्राने यासाठी 4714 कोटींची मदत जाहीर केली. शिवाय, मुख्यमंत्री लवकरच राज्यातील भीषण दुष्काळावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावणार असल्याची माहिती सीएमओने दिली.