Ads
Exclusive बातमीदार स्पेशल

दरमहा ६कोटी खर्च करूनही शहरात पाण्याची बोंब

पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या रांगा
डेस्क desk team

पाणी वितरणावर पालिकेडून दरमहा ६ कोटी खर्च, तरी शहरात पाण्यासाठी ठणठणाट

प्रसेनजीत इंगळे | बातमीदार

पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या रांगा

विरार : शहरात अनेक भागात पाणीटंचाईच्या तक्रारीपुढे येत असताना याला पालिकेच्या वितरण व्यवस्थेच घोळ असल्याने शहरातील विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. या बाबत माहिती मिळवली असता पालिका फक्त पाणी वितरणावर महिन्याला ६ कोटी ६२ लाख ८८ हजार ३०० रुपये खर्च करत असल्याची माहिती ‘सिटी रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेने समोर आणली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यास असमर्थ आहे.

वसई विरार परिसरात मागील काही दिवसापासून अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अनेक भागात चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, त्यात अनेकदा कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. यामुळे अनेक गृहसंकुलांना पाण्यासाठी टॅंकरचा वापर करावा लागत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

‘सिटी रिसर्च फाऊंडेशन’ ने मिळवलेल्या माहितीनुसार दर दिवसाला पालिकेला १ दशलक्ष लिटर पाण्यावर दिवसाला ९६०७ रुपये खर्च येतो. अशा पद्धतीने २३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला दर दिवसाला २२ लाख ०९ हजार २३० रुपये खर्च होतो. म्हणजेच पालिका दर महिन्याला केवळ पाणी वितरणावर ६ कोटी ६२ लाख ८८ हजार ३०० रुपये खर्च करते. यात १५ टक्के गळती असल्याचे पालिकेने सांगितले आहे. म्हणजे दिवसाला ३४.५ दशलक्ष लिटर पाणी पालिकेकडून वाया जात आहे. ही गळती इतर महानगर पालिकेच्या तुलनेने सर्वाधिक आहे. अशा पद्धतीने दर महिन्याला ३४. ५ दशलक्ष लिटर प्रमाणे पालिकेला दिवसाला ३ लाख ३१ हजार ४४१ रुपये पालिका वाया घालवत आहे. हेच गणित महिन्याचे मांडले असता ९९ लाख ४३ हजार २३० रुपये महिन्याला वाया घालवले जात आहेत. साधारणपणे दरवर्षी पालिकेचे ११ कोटी ९३ लाख रुपये दरवर्षी केवळ पाणी गळतीमुळे वाया जात आहेत. असे असतानाही पालिका पाणी वितरणाचे नियोजन सुधारण्याकडे कोणतेही लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांचा कोट्यावधी कराचा पैसा वाया तर जात आहे. *(सदरची माहिती ही माहिती अधिकारात मिळाली आहे) 

वसई विरार शहराची लोकसंख्या पालिकेने २४ लाख गृहीत धरली आहे. सध्या शहराला सुर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २०० दशलक्ष लिटर्स, उसगाव आणि पेल्हार मधून ३० दलशक्ष लिटर्स असा मिळून दररोज २३० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होत असतो. वसई विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज नवनवीन इमारती उभ्या राहत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु पाणी गळतीमुळे पाणी पुरवठा कमी होत असल्याने पालिकेने चक्क नवीन नळजोडण्यांना परवानगी देणे मागील तीन वर्षांपासून बंद केले.  सध्या पालिकेकडे २ हजार ३०८ नवीन नळजोडण्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

त्यातही प्रति माणसी १३५ लिटर पाण्याची गरज असताना पालिकेकडून केवळ ९५ लिटर पाणी सरासरी दिले जात आहे. शहरातील २४ लाख लोकसंख्येला ३७२ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र कमी पाणी आणि पाण्याची गळती मिळून दरररोज शहराला १२० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे.

शहरात ७५० किमी जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. त्यानुसार केवळ ६५ हजार ९०० नळ जोडण्या पालिकेने दिल्या आहेत.  त्यात ५९ पाण्याचे वितरण करण्यासाठी जलकुंभ असताना केवळ १९ जलकुंभ सुरू आहेत. तर १८ टाक्यांची कामे प्रलंबित आहेत. यामुळे पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

 

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: