बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाकडून घोडचूक, प्रश्नपत्रिकेत सरळ उत्तरे
प्रसेनजीत इंगळे | बातमीदार
विरार : आज पासून बारावीच्या परिक्षेला सुरवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५४ केंद्र असून त्यात ४९ हजार ११६ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. पेपर मध्ये कॉपी करता येणार नाही यासाठी राज्य मंडळाने मोठा निर्णय घेत परिक्षा केंद्राजवळील सर्व छपाई, झेरॉक्सची दुकाने बंद ठेवली आहेत. आणि ठिकठिकाणी भरारी पथक नेमण्यात आले. पण विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची गरजच पडली नाही. कारण मंगळवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चक्क बोर्डानेच विद्यार्थ्यांचे काम सोपे केले. या प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तरेच छापून दिल्याने विद्यार्थ्यांना फुकटचे सहा गुण दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे बोर्डाची ही घोडचुक विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार की नाही याची बोर्ड काय निर्णय घेते यावर अवलंबून आहे.
काय आहे नेमका प्रकार ?

बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर, यात केल्या बोर्डाकडून चूका
मंगळवारी १२ वी चा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होता. सदरच्या विषयासाठी ८० गुणांची प्रश्नपत्रिका परिक्षा बोर्डाकडून तयार करण्यात आली होती. यातील प्रश्न क्रमांक ३ हा कवितेवरील आधारित प्रश्न होता. या प्रश्नाच्या उपप्रश्नात २ गुणांसाठी ३ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील प्रश्न क्र. QA3, QA4, आणि QA5 हे तीन प्रश्न २-२ गुणांसाठी होते. पण या तीनही प्रश्नाची केवळ उत्तरे छापली गेली आहेत. तर प्रश्न छापण्यात आलाच नाही. सदरची चुक ही परिक्षा मंडळाची असल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे ६ गुण दिले जाणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.
या बाबत माहिती देताना शिक्षण विभागाने सांगितले की, ही चूक परिक्षेच्या दरम्यान लक्षात आल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी शाळांना उच्च माध्यमिक मंडळाशी पत्रव्यवहार करावा लागणार आहे. त्यानुसार मंडळ यावर जो निर्णय घेईल त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.तर शिक्षण विभागातील तज्ञ शिक्षकांनी यावर मत देताना सांगितले की, अशा स्थितीत चूक ही बोर्डाची असल्याने विद्यार्थ्यांना सरळ गुण दिले जातात. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या घोडचूकीमुळे सहा गुण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. —