विरार मध्ये समता कन्व्हेन्शन सेंटरचा पायाभरणी समारंभ संपन्न
विरार : बहुजन समता प्रबोधिनी या संस्थ्येच्या वतीने रविवारी समता समता कन्व्हेन्शन सेंटरचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला. मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगूरु तथा माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते हा कोनशिला अनावराचा कार्यक्रम पार पडला. या समता कन्वेन्शन सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सेवा सुविधा उभारण्यात येणार आहेत.
विरार मधील संस्था बहुजन समता प्रबोधिनी ही संस्था मागील ३० वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. विद्यार्थांना शैक्षणिक अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणी ओळखून संस्थेच्या वतीने समता कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेंटर अध्यावत अभ्यासिका, पारंपारिक व ई-ग्रंथालय, संगणक केंद्र, कलादालन, सेमिनार व परिषद सभागृह, स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र, गेस्ट हाऊस, मेडीटेशन सेंटर, कॅफेटोरीया,हेल्थ सेंटर, कम्युनिटी सर्विस लीगल एड सेंटर, विद्यार्थी कौशल्य विकास केंद्र, समुपदेशन केंद्र, आणि सामाजिक संशोधन इत्यादी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तर खासदार राजेंद्र गावीत यांनी या वास्तूचा उपयोग तळागळातील गरूजु विद्यार्थ्यांना होणार असून या सेंटरची आवश्यकता जिल्ह्याला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सेंटरच्या उभारणीत ज्या सरकारी परवानग्या लागतील त्या तातडीने पालिकेच्या वतीने दिल्या जातील तसेच पालिकेच्या वतीने ग्रंथालय निर्मीतीसाठी सहकार्य केले जाईल असे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.
या प्रसंगी भालचंद्र मुणगेकर यांच्यासह वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपारा आमदार क्षितीज ठाकूर, पालघरचे खासदार राजेंद्र गावीत, माजी महापौर राजीव पाटील, वसईव विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, माजी स्थायी समीती सभापती अजीव पाटील, जीतूभाई शहा, प्रशांत राऊत, माजी नगरसेवक विलास चोरघे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या हस्ते संस्थेच्या ३० वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन वर्तक महाविद्यालयाचे प्रा. सुरेश गोतपागर यांनी केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रा. भिमराव पेटकर, रमेश निरभवणे, प्रसेनजीत इंगळे, गौतम मस्के, बाबासाहेब ओव्हाळ, मनोज जोगदंड, अमर मस्के, अभिजीत गायकवाड, प्रवीण गायकवाड, रमेश वावळे आणि इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिनेश कांबळे यांनी हे सेंटर विद्यार्थ्यांना नव्या दिशा देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला असून अनेक दानशुरांनी पुढे येऊन संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. समारंभाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचीव डॉ. बाबा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या दिवशी रानळे तलाव येथिल मोल मजूरी करणाऱ्या महिलांनी २५ हजार रुपये गोळा करून इमारत उभारणीसाठी हातभार लावला.
