महापालिकेच्या दप्तरी नोंद नसलेल्या पालिकेच्या महिला उद्योक केंद्राचा पालिकेच्या ठेकेदाराकडून वापर
बातमीदार प्रतिनिधी
विरार : वसई विरार महापालिकेच्या मालमत्ताचा गैरवापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मुळात महापालिकेच्या मालमत्तांची पालिकेलाच माहिती नसल्याने या मालमत्ता राम भरोसे आहेत. वसई विरार महापालिकेच्या दप्तरी प्रभाग समिती ब येथील महिला उद्योग केंद्राची कोणतीही नोंद नाही. पण या केंद्राचा वापर पालिकेच्या फवारणी विभागाच्या ठेकेदाराकडून मोफत केला जात आहे. यामुळे जर पालिकेला या मालमत्तेच्या बाबतीत कोणतीही माहिती नाही तर ठेकेदार या मालमत्तेचा वापर कसा करत आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा, त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, महिलांना आर्थिक संपन्न होता यावे, अशा बहुउद्देशातून तत्कालिन विरार नगर परिषदेने विरार-मनवेल पाडा येथे महिला उद्योग केंद्राची निर्मिती केली होती. या केंद्रातील गाळे नाममात्र शुल्कात महिलांना देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न होता. वसई-विरार महापालिका स्थापनेनंतर या उद्योग केंद्राची मालकी पालिकेकडे आली आहे. मात्र या उद्योग केंद्राला नवसंजीवनी देण्याऐवजी महापालिकेने या केंद्रातील गाळे सफाई ठेकेदारांना मोफत वापरासाठी दिले आहेत.
लोकसत्ता ने पालिकेच्या मालमत्ता च्या बाबतीत वृत्तांकन केले असताना या महिला उद्योग केंद्राचे कोणतेही अहवाल पालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहीती समोर आली होती. मात्र मागील तीन वर्षापासून पालिकेच्या ठेकेदाराकडून या मालमत्तेचा फुकट वापर केला जात असल्याने पालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुढे आला आहे.
विरार पुर्वेच्या मनवेल पाडा येथे असलेल्या या महिला उद्योग केंद्रातील बहुतांश गाळे सद्यस्थितीत बंद आहेत. देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने यातील अनेक गाळांची दुरावस्था झाली आहे. हे केंद्र गटारावर बांधले असल्याने धोकादायक स्थीतीत आले असताना यात काही महिला आपला व्यवसाय करत आहेत. पण बहुतांश गाळ्याचा वापर हा पालिकेच्या ठेकेदाराकडून बिनदिक्कत केला जात आहे.
वसई विरार महापालिकेने क्षेत्रातील घनकचरा संकलन व औषध फवारणी करणारे उजाला लेबर कॉन्ट्रक्टर व किरण कॉर्पोरेशन या ठकेदारांना कोट्यावधीचा ठेका दिला आहे. यामुळे पालिकेची मालमत्ता वापरताना पालिकेने या ठेकेदारांकडून भाडे घेणे अपेक्षित आहे. त्याच बरोबर कामगारांना कामगारांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याची जबाबदारी ठेकेदारांची असताना हे दोन्ही ठेकेदार मात्र बिनधास्त पालिकेच्या महिला उद्योग केंद्राचा वापर करत आहेत. या ठिकाणी मागच्या महिन्यात ठेकेदाराने ठेवलेल्या फवारणीचे औषध पिल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या महिला उद्योग केंद्रात ठेकेदाराने पाण्याच्या बाटलीत फवारणी औषध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे ठेकेदार वापरत असलेल्या या महिला उद्योग केंद्रातील गाळांची पालिकेने पाहणी करणे गरजेचे असताना पालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.
मुळात ही मालमत्ता पालिकेच्या मालकीची असून पालिकेने कुणालाही वापर करण्यासाठी देताना त्याच्याकडून बाजारभावाने भाडे घेणे अपेक्षित आहे. असे असतानाही मागील अनेक वर्षापासून हे ठेकेदार बिनदिक्कत या गाळ्यांचा वापर करत पालिकेची आर्थिक फसवणूक करत आहेत.
