
rakhi
विरार : करोना नंतर सणांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी शहरातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. पण यावर्षी इतर सणांच्या प्रमाणे या सणावरही महागाईची छटा कायम असल्याने राख्यांच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. कमीत कमी राखी १० रुपयापासून सुरवात होणारी राखी आता २० ते ३० रुपयापासून ते ५०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.
येत्या ११ ऑगस्टला राखी पौर्णिमा असून यासाठी वसई विरार सह ग्रामीण भागातल्या बाजारपेठा सजल्या आहेत. बदलत्या काळानुसार सण-उत्सव साजरा करण्याचा ट्रेण्डही बदलत असल्याने यंदा रक्षाबंधनसाठी पारंपरिक गोंड्याच्या, लोकरीच्या राख्यांबरोबरच चायनीज आणि फैन्सी तथा विविध अॅक्सेसरीजच्या राख्या आल्या आहेत. याशिवाय अॅक्सेसरिज, आणि खड्यांच्या राख्या सुद्धा बाजारात आल्या आहेत. त्याच बरोबर चांदीच्या, सोन्याचा मुलामा असलेल्या कास्टिंगच्या राख्या सुध्दा काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर यावर्षी प्रथमच ‘मराठी, मी मराठी, एक मराठा लाख मराठा, तुझी ताई’ अशा शब्दांच्या राख्या बरोबर ओम, स्वस्तिक सारखी चिन्हे, नमो रुद्राक्ष, कासव, गणेश, चंदन, मेटल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेल्या राख्या, राजमुद्रा तलवार असलेल्या राख्यांना सुद्धा चांगली पसंती मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर बच्चे कंपनीसाठी विविध कार्टून, लायटिंग, खेळ, घड्याळ स्वरूपाच्या राख्या सुध्दा बाजारात उपलब्ध आहेत.
करोना नंतर आल्या आर्थिक मंदीने सणावार महागले असल्याने कमीत कमी २० ते ३० रुपयांपासून परवडेल अशा किमतीत राख्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. स्पंज आणि चमकीदार राख्या राख्यांची परंपरा असलेल्या मोठ्या राख्या यावर्षी बाजारात दिसत नाहीत. एकेकाळी महिलावर्गाला या राख्यांनी भुरळ घातली होती. पण आता पारंपरिक राख्यांची मागणी घटली आहे.
सोशलमिडिया आणि ऑनलाईनवरूनही राख्यांच्या खरेदीला प्रतिसाद
सोशल मीडियावर राख्यांची ऑनलाईन मार्केटिंग सुरू फोटो, व्हिडीओ टाकून सविस्तर माहितीदेखील उपलब्ध महिलांना घरबसल्या मनपसंत राख्या उलबल्ध करून दिल्या जात आहे. तर अनेक ठिकाणी बांबू तथा नैसर्गिक साहित्याचा वापर केलेल्या राख्यांची समाज मध्यामांवरून जोरदार मार्केटिंग सुरु आहे. त्यात ऑनलाईन विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तूसह राख्यांचे कोम्बो ऑफर सुरु केल्या आहेत. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही महिला बचत गटांनी आणि समाज सेवी संस्थां सुध्दा यावर्षी राख्या विक्रीला उतरल्याचे चित्र दिसत आहे.