अखेर २५ वर्षजुन्या रुग्णालयाची मान्यता रद्द
वसईतील पहिले रुग्णालय
विरार : वसई विरार महानगर पालिका वैद्यकीय विभागाने वादग्रस्त वसईतील व्रेथ केअर रुग्णालयावर शेवटी कारवाई करत त्याची मान्यता रद्द केली आहे. अशा पद्धतीने मान्यता रद्द होणारे हे वसईतील पहिलेच रुग्णालय आहे. मागील २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या या रुग्णालयावर पालिकेच्या कारवाईने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयाचा डॉक्टर संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वसई विरार महानगर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने वसई आनंद नगर परिसरातील ब्रेथ केअर रुग्णालयावर कारवाई केली आहे. मागील अनके महिन्यापासून या रुग्णालयाच्या विरोधात येथील स्थानिक रहिवाश्यांच्या तक्रारी होत्या. या रुग्णालयात नर्सिंग होम च्या नावाखाली क्षयरोगाचे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जात असल्याच्या आरोप करत इतर रहिवाश्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात राज्य आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने या रूग्णालया संदर्भात चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वसई विरार महानगरपालिका आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधिकारी सुरेखा वाळके यांनी माहिती दिली की, या रुग्णालयाच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच या रुग्णालयाला स्थानिक रहिवाशी संकुलाचा न हरकत दाखला नव्हता, या रुग्णालयाचे अग्नीसुरक्षा चाचणी प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. तसेच नागरिकांच्या सततच्या तक्रारी असल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या मान्यता रद्द प्रकरणी वसई विरार डॉक्टर संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षापासून हे रुग्णालय बिनदिक्कत या परिसरात सुरु आहे. जर यांना परवाने नसते तर पालिकेने आधी त्यांना परवानगी कशी दिली हा सवाल डॉक्टर संघटना विचारात आहेत, अनेक नर्सिंग होम, रुग्णालय ही नागरी वस्तीत आहेत. अशा पद्धतीने कारवाईचा धसका आता या रुग्णालयांनी घेतला आहे.
“ आयुक्तांच्या आदेशानुसार आणि राज्य आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या सुद्धा अनेक तक्रारी आहेत. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.” – डॉ. सुरेखा वाळके – वैद्यकीय अधिकारी, महानगर पालिका
“ अशा पद्धतीने वसई विरार मधील जुने रुग्णालय बंद करणे चुकीचे आहे. केवळ नागरिकांच्या तक्रारीवर रुग्णालय बंद पडायला लागले तर वसई विरार मधील ७० टक्केहून अधिक रुग्णालये बंद करावी लागतील. जर या रुग्णालयाला परवानगी नव्हत्या तर पालिकेने इतके वर्ष गप्प का राहिले” – डॉ. संजय मांडवकर – अध्यक्ष, डॉक्टर संघटना नालासोपारा.