Ads
बातम्या

श्रावणमासाचा फटका मासेमारी व्यवसायाला.

डेस्क बातमीदार

श्रावणमासाचा फटका मासेमारी व्यवसायाला.

विरार :  श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या उपवासाचा फटका मासेमारी व्यवसायाला बसत आहे. समुद्रातून मासे मिळत असले तरी ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मच्छीमार आर्थिक संकटात अडकले आहेत. मागील तीन वर्षापासून वादळ, अतिवृष्टी, आणि करोना यामुळे आधीच हवालदिल झालेल्या मच्छीमारांवर आता श्रावण महिन्यात उपासमारीची वेळ आली आहे.

मागील दीड वर्षांतील कोरोनास्थिती, डिझेलसह मासेमारी साहित्याचे वाढलेले भाव आणि पडलेले मासळीचे दर अशा विविध समस्या मच्छीमारांना सोसाव्या लागत आहेत. त्यात मागील दोन वर्षापासून असलेला करोना काळ आणि त्याच्या टाळेबंदीच्या जाचक अटी यामुळे मच्छीमार आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. नुकताच मासेमारीला परवानगी मिळाल्याने मच्छीमार मासेमारीसाठी सागरात जात आहेत. पण मासळी मिळूनही श्रावण महिन्यातील उपवासांमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

जवळपास दोन महिन्याच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. त्यातच हवामान खात्याकडून  ३  ते ५ ऑगस्टदरम्यान समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवून  सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यामुळे ६ ऑगस्टनंतरच मच्छीमारांना मासेमारीसाठी जाण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने सूचित केले होते.त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ६० टक्के  या आठवड्यात  मासेमारीसाठी खोल समुद्रात गेल्या होत्या. त्यापैकी काही बोटी कमी मासे मिळत असल्याने लवकर  किनारी परतल्या. ३५० ते ५०० ग्राम वजनाच्या पापलेट माशांची अपेक्षा  असताना परतलेल्या बोटीना केवळ २०० ते ३०० ग्राम वजनाचे लहान आकाराचे पापलेट लागत आहेत. त्यात निर्यातीचे भाव निर्यातदाराने करोनाचे कारण सांगत आधीच कमी केले आहेत. त्यामुळे किलोमागे२५० ते ३००  रुपयांचा फटका मत्स्य विक्रेत्यांना सहन करावा लागत असल्याचे वसईतील विक्रेते मिल्टन ससोदीया यांनी सांगितले.  विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३०  रुपयांनी डिझेल दरवाढ झाली आहे. खलाशांचे पगार वाढल्याने १० -१२  दिवसांच्या मासेमारी फेरीसाठी  ३५  ते ४० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.

अशा परिस्थितीत वसईतील मच्छीमारांकडून आणल्या गेलेल्या मासळीचा लिलाव पाचूबंदर येथील मच्छीमार सोसायटीकडून दर मंगळवारी रात्री आयोजित करण्यात येतो; या लिलावात मुंबई, ठाणे, नाशिक आणि अन्य ठिकाणाहून व्यापारी बोलीकरता सहभागी होतात. मात्र सोमवारपासून श्रावण सुरु झाल्याने या बाज़ाराकडे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. यामुळे मासे असूनही ग्राहक मिळत नसल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: