प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वसई विरार मीरा भाईंदर मध्ये हवेचे चाचणी यंत्र.
विरार : वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात वाढत्या प्रदूषणाचा स्थर पाहता केंद्रीय प्रदूषण मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने मीरा भाईंदर वसई विरार शहरात दोन ठिकाणी हवेचे चाचणी यंत्र बसविण्यात येणार आहेत याचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना आणि पर्यावरण प्रेमीना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील काही वर्षापासून वसई विरार आणि मीरा भाईंदर परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाहनांमुळे शहरातील हवेचा स्थर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. त्यात वसई विरार महानगर पालिकेने नैतिक जबादारी झटकत मागील ७ वर्षापासून पर्यावरण अहवाल तयारच केला नाही. तर मीरा भाईंदर पालिकेकडून पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक पाऊले उचलली नाहीत. यामुळे वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील हवेचे नियमित परीक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे केंद्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश दिले की वसई विरार, आणि मीरा भाईंदर या दोन शहरात हे यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यात विरार मधील बोळींज मासळी बाजार परिसरात आणि मीरा भाईंदर मधील आझाद मैदान या ठिकाणी हे यंत्र बसविण्यात येणार आहे. याचे नुकतेच क्षेत्रीय अधिकारी जयप्रकाश भुसारा यांनी भूमिपूजन केले आहे. यासाठी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांच्या मागर्दर्शनाखाली उपप्रादेशिक अधिकारी ईश्वर ठाकरे काम पाहणार आहेत.
या यंत्राचे काम तीन महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. या यंत्राच्या सहायाने शहरातील हवेचे २४ तास परीक्षण केले जाणार आहे. हवेतील प्रदूषित घटकाचे मापन या यंत्राद्वारे केले जाईल. यात हवेतील कार्बन मोनाक्साईड, कार्बन डायऑक्साईड, आणि इतर प्रदूषित घटकांची माहिती उपलब्ध होणार आहे. याचे जागेवर चित्रीकरण बरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा माहिती उपलब्ध होणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी ईश्वर ठाकरे यांनी सांगितले.
सदर यंत्रामुळे नागरिकांना शहरातील हवेची गुणवत्ता कळणार आहे. याचा बरोबर प्रशासनाला यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्या लागतील याची आखणी करणे सोपे होईल. यामुळे हवेची गुणवत्ता वाढतावा येणार आहे.