येत्या 1 एप्रिलपासून भारतीय वाहन इंडस्ट्रीमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. या बदलानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी ठरवलेल्या निकषांचे पालन करण्यासाठी सर्व बीएस-4 मॉडेल वाहनांची आरटीओ नोंदणी बंद केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या बीएस-4 वाहनाची आरटीओ नोंदणी झालेली नसेल, तर ती लवकरच करून घ्या.
विविध राज्यांच्या अतिरिक्त परिवहन आयुक्तांनी, 18 फेब्रुवारी रोजी वाहन नोंदणीसंदर्भात राज्यभरातील परिवहन अधिकाऱ्यांना हे निर्देश जारी केले आहेत. बीएस-4 मॉडेल वाहनांची नोंदणी 1 एप्रिलपासून होणार नाही. त्यापूर्वी, सर्व प्रलंबित वैध कागदपत्रे सादर करून, वाहनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
वाहन विक्रेत्यांना असे आवाहन करण्यात येत आहे कि, जर त्यांच्या डिलर पॉईंटला नोंदणीत अडथळा असेल किंवा त्यांना अद्याप नोंदणी क्रमांक दिलेला नसेल, तर वाहन खरेदीदार डिलर पॉईंटकडून खरेदीची सर्व कागदपत्रे घेऊन अर्ज करून प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करू शकतात.