जगभरात 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहकदिन म्हणून साजरा करण्याच येतो. या दिवशी जगात प्रथम अमेरिकेच्या ग्राहकांना चार हक्क अमेरिकन सिनेटने मंजूर केले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोन एफ केनेडी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात दिलेले वचन पूर्ण केले. त्यानंतर जगभरात ग्राहकांनी आवाज उठवायला सुरुवात केली. जगभरातील ग्राहकांच्या हक्कासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. तेंव्हा पासून जगभरात जागतीक ग्राहकदिन साजरा करण्यास सुरवात झाली
ग्राहकांचे हक्क
1. सुरक्षिततेचा हक्क –
ग्राहकांच्या आरोग्याला अथवा जीवाला अपायकारक उत्पादने, उत्पादन प्रक्रिया, सेवा यांच्या पासून संरक्षण मिळण्याचा हक्क.
उदा. – अन्न, औषधे, विजेची उपकरणे, स्वयंपाकाचा गॅस, वीजपुरवठा इ. बाबतीत सुरक्षितता ही विशेष महत्वाची असते. त्यामुळे अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा, औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा कायदा इत्यादी कायदे व अनेक नियम भारत सरकारने केले आहेत. तसेच काही विजेच्या उपकरणांबाबत आय.एस.आय. ISI हे चिन्ह घेणे उत्पादकांना बंधनकारक केले आहे.
2. माहितीचा हक्क –
वस्तु व सेवांची डोळसपणे निवड करण्यासाठी आवश्यक असलेली व पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क – जाहिरात, वस्तूवरील लेबल, वेष्टण याद्वारे किंवा अन्य मार्गांनी दिलेली माहिती चुकीची, किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्यापासून संरक्षण मिळण्याचा हक्क.
उदा. – पॅकबंद वस्तूंच्या अधिनियमानुसार (1976) वस्तूच्या वेष्टणावर उत्पादकाचे नांव व पत्ता, वस्तूचे नांव, अधिकतम किरकोळ किंमत (MRP), वजन माप, उत्पादनाची/पॅकिंगची तारिख, औषधांच्या बाबतीतExpiry Date, उत्पादनाबाबत तक्रार करण्याचा पत्ता इत्यादी माहिती छापणे बंधनकारक आहे.
3. निवड करण्याच्या हक्क –
विविध वस्तु/सेवा स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध असण्याचा व त्यातून आपल्या पसंतीप्रमाणे निवड करण्याचा हक्क
4. मत ऐकले जाण्याचा हक्क – (Right to be heard)
ग्राहकांवर परिणाम करणारी आर्थिक व इतर धोरणे ठरवताना व उत्पादनविषयक निर्णय घेताना ग्राहकांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक व साकल्याने विचार केला जाण्याचा हक्क.
उदा. आज वीज कंपन्यांना दरवाढ करावयची असल्यास तसा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे द्यावा लागतो. आयोग या प्रस्तावाला प्रसिध्दी देऊन ग्राहकांना त्यावर मत मांडण्याची संधी देतो.
5. ग्राहक शिक्षणाचा हक्क –
ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये यांची जाणीव ठेऊन वस्तू व सेवांची आत्मविश्वासाने आणि काळजीपूर्वक निवड करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य मिळवण्याचा हक्क.
उदा.- दूरचित्रवाणीवर प्रदर्शित होणारी“जागो ग्राहक जागो” ही मालिका ग्राहक शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करते.
6. तक्रार निवारणाचा हक्क –
तक्रार उद्भवल्यावर ग्राहकाच्या न्याय्य मागणीचे योग्य प्रकारे निवारण होण्याचा हक्क. तसेच सदोष वस्तु/सेवा यांमुळे ग्राहकाचे नुकसान झाल्यास ग्राहकाला त्याबद्दल भरपाई मिळण्याचा हक्क.
7. आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क –
मानवी जीवनाचा दर्जाउंचावणारे आरोग्यदायी पर्यावरण मिळण्याचा हक्क. प्रदुषणामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळण्याचा हक्क. या हक्काच्या संरक्षणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा तसेच वाहने, कारखाने यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम केलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावरही निर्बंध आहेत.
वरील सगळे हक्क ग्राहकांना मिळवुन देण्यात ग्राहक संरक्षण कायद्याने महत्वाची भूमिका बजावली आहे.
इथे करता येईल तक्रार
ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून jagograhakjago.gov.in ही तक्रारीसाठी वेबसाईड जारी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे टोल फ्री नंबर 1800114000 हा ग्राहक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.