जगभरात धुमाकूळ घातलेल्या करोना विषाणूने राज्यातील मुंबईसह इतर भागात शिरकाव केला आहे. या संदर्भातील संशयित रुग्ण मुंबईत आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनी दिली आहे.
मुंबईतील अनेक पर्यटक पालघर जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असतात.या भागात ते वास्तव्यास हि येतात. त्यामुळे जिल्ह्यात विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केल्याचे जाहीर केले आहे. तसेच या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कांचन वानरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस, आरोग्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण, औद्योगिक विभाग तसेच सेवाभावी संस्था यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत या सर्व विभागांनी जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करून दैनदिन अहवाल सादर करण्याचे आदेश हि जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ती पूर्णवेळ तैनात ठेवायची आहेत. हा कायदा लागू केल्यामुळे आता आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबधित विभागाला दिले आहेत.
सतर्क राहण्याचे आदेश
शहर-जिल्ह्यात ‘करोना’चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या’ घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केले आहे.
अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई
जनतेमध्ये भीती पसरू नये म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारे शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करावे. सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी दिलेत.