संपूर्ण हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी नालासोपारामध्ये तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी शहरात छत्रपतींचा जयघोष करत ढोल-ताशाच्या गजरात शिवप्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूकहि काढण्यात आली. या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत शिवराज तरुण मित्र मंडळतर्फे तिथीनुसार शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ९ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मावळे उपस्थित होते. यांनतर सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली.
दरम्यान सायंकाळच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या पारसनगर मधून सायंकाळी ४ च्या सुमारास शिवप्रतीमा घेऊन भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत मुल-मुली लेझीम खेळले. तसेच लहानगे शिवबा सुद्धा या मिरवणुकीत अवतरले होते. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत, छत्रपतींची प्रतिमा असलेल्या झेंडे फडकावून हि मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. या मिरवणूकीची सांगता डॉन लेनच्या आत मंडळाच्या परिसरापर्यंत झाली.
या मिरवणुकीचे आयोजन संस्थापक विकास जैतापकर, प्रमुख सल्लागार राजू तळेकर व समीर निकम यांच्यासह विविध शिवप्रेमींच्या हस्ते करण्यात आले होते. या मिरवणुकीला मोठ्या संख्येने मावळे उपस्थित होते.