चीनसह जगभरात धुमाकूळ घातलेल्या करोना विषाणूने आता महाराष्ट्रातहि शिरकाव केला आहे. राज्यातील विविध भागात संशयित रुग्ण आढळून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वसई विरार मध्ये मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. धक्कादायक म्हणजे या तुटवड्यावर मात करण्यासाठी काही मेडिकल दुकानदारांनी लोकल सॅनिटायझर्स बाजारात विक्रीस आणली आहेत.मात्र हे लोकल सॅनिटायझर्स करोनाचा सामना करू शकतील का अशी भीती नागरिकांना सतावतेय.
शहरात करोना विषाणूच्या धास्तीने सर्वच नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या हेतूने मास्क व सॅनिटायझर्सची विक्री सुरु केली. मात्र काही दिवसातच नागरिकांचा मास्क व सॅनिटायझर्स घेण्याचा कल वाढल्याने सद्यस्थितीत शहरात हँड सॅनिटायझर्स व मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांकडे मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच काही दुकानदार उपलब्ध मास्कसाठी जास्तीचे पैसे आकारात आहेत. त्यातच शहराच्या विविध भागात आता ब्रँडेड हँडसॅनिटायझर्स मिळत नाही आहे. मात्र या गंभीर परिस्थीतीचा फायदा घेऊन अनेक दुकानांमध्ये पूर्वी कधीही न ऐकलेल्या ब्रँड्सचे सॅनिटायझर्स ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. तर काही दुकानांमध्ये आणखी तुटवडा निर्माण होण्याची भीती दाखवून वाढीव दराने विक्री केली जात आहे.
दरम्यान या भीषण परिस्थिती काही नागरीकानी लोकल सॅनिटायझर्स विकत घेतले आहे. मात्र हे सॅनिटायझर्स करोनाचा सामना करू शकतील का अशी भीती नागरिकांना सतावतेय. तसेच पालघर जिल्ह्यात ‛कोरोना’ व्हायरसचा संसर्ग वाढू नये तसेच तात्काळ उपाययोजना करता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यामध्ये ‛आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केल्याची घोषणा केली आहे.