कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकुळ घातला असून यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.’महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
घाबरून जाऊ नका,
अफवा पसरवू नका!#coronavirus pic.twitter.com/kuRQ8t1VBC— Rajesh Tope (@rajeshtope11) March 3, 2020
कोरोनाच्या संशयित असल्याच्या असंख्य वृत्त समोर येत आहेत. तसेच सोशल मिडीयावर सध्या या व्हायरस संदर्भात व्हिडीओ व मेसेज पाठवले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र आरोग्य मंत्र्यांनी आज केलेल्या विधानानंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
टोपे यांनी आज विधान परिषदेत कोरोना व्हायरस संदर्भात निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी या व्हायरसशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा कशी सज्ज आहे याबाबतची माहिती दिली. ‘करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत. राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. ‘करोना’च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच मुंबईत तीन ठिकाणी केंद्रं उभारण्यात आली आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे,’ अशी माहितीही टोपे यांनी दिली.