धुळ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीने वसतीगृहातील टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या मुलीने लहान बाळाला जन्म देईपर्यत वसतीगृहातील कुणालाच याबाबत काही माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित केले जात आहे. याबाबत निवासी वसतीगृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील संशय बळावत आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील एका निवासी वसतीगृहातील एफवायबीएमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 18 वर्षीय मुलीने चक्क वसतीगृहाच्या टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर बाळाला त्या मुलीने तिथेच बादलीमध्ये सोडून दिले आणि भीतीपोटी पुन्हा मुलींमध्ये येऊन झोपी गेली. दरम्यान काही वेळानंतर बाळ रडू लागल्याने बाळाच्या आवाजाने वसतीगृहाच्या वार्डन यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बादलीत बाळ पालथे पडले आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कुणीही समोर यायला तयार नव्हते. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित मुलीला आरोग्य तपासणीसाठी नेले असता हे बाळ तिचे असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत निवासी वसतीगृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील संशय बळावला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता वसतीगृह प्रशासनाकडून पाळली जात आहे. तसेच सध्या बाळ आणि बाळंतीण दोघांनाही पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साक्री पोलीस ठाण्यात याबद्दल नोंद करण्यात आली असून पुढील तपास साक्री पोलीस करीत आहेत.