ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे,‘जिद्द विशेष’ शाळेतील विशेष मुलांनी दाखवलेल्या जिद्दीच्या बळावर डहाणूचा समुद्र किनारा प्लास्टिकमुक्त झाला. यामध्ये जवळ जवळ या विशेष मुलांनी २०० किलो प्लास्टिकचा कचरा जमा केला. त्यामुळे जर विशेष मुले जर पर्यावरणाचे महत्व समजू शकतात तर इतर नागरिक का समजू शकत नाही असा प्रश्न त्यांनी पर्यटकांसमोर ठेवला आहे.
स्वच्छता मोहिमेनुसार फेब्रुवारी २८ च्या शुक्रवारी डॉ.विन्हेरकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या धर्मवीर आनंद दिघे,‘जिद्द विशेष’ शाळेतील विशेष मुलांनी प्लास्टिक कचरा गोळा करून डहाणूच्या समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत २०० किलो प्लास्टिकचा कचरा मुलांनी जमा केला. दरम्यान या मोहीमेत विशेष मुलांचे पालक सुद्धा उपस्थित होते. दरम्यान जर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष मुले पुढे येऊ शकतात. तर जे धडधाकड आहेत त्यांनी सुद्धा पर्यावरण व स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
‘ड्रॉप्लेज’ सामाजिक संस्था वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन अँड अनिमल वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूसीएडब्ल्यूए) यांचे या मोहिमेला सहकार्य होते. ‘ड्रॉप्लेज’ संस्थेने या मोहिमेला ‘ओशन हिरोज’ असे आगळेवेगळे नाव दिले होते. या मोहिमेबद्दल ड्रॉप्लेजच्या सोनिया डिसुझा-भावसार यांनी सांगितले की, आजच्या या मोहिमेत जिद्द शाळेतील विशेष मुले सहभागी झाली असून त्यांच्यातही प्लास्टिकमुळे होणा-या प्रदूषणाबाबत जागृकता निर्माण झाली आहे, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आता आम्ही देखील कुठेही कचरा टाकणार नाही. आणि लोकांनाही कचरा टाकू नका असे आवाहन करू, असे मनोगत जिद्द शाळेतील विशेष मुलांनी व्यक्त केले.