वसई-विरार शहरातील अनधिकृत शाळांचा आकडा 153 वर आहे. या शाळेमधून बक्कल डोनेशन घेऊन सामान्य नागरिकांची फसवणूक होत असून शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन अनधिकृत शाळांवर व स्थानिक प्रशासनावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्यांनी मनविसे शिष्टमंडळाला लवकरच यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
शालेय शिक्षण सुरु होण्यापूर्वी वसई तालुक्यात तब्बल 153 अनधिकृत शाळा असल्याचे स्थानिक प्रशासानाने जाहीर केले होते. तसेच या शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन पालकांना केले होते. मनविसे सुद्धा अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन पालकांना केले होते. तसेच अनधिकृत शाळा असा फलक प्रत्येक शाळेच्या बाहेर लावण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिला होता. परंतु अनधिकृत शाळेने हा आदेश धुडकावून शाळा तशाच सुरु ठेवल्या आहेत.
तसेच या शाळांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाकडून यावर कारवाई होत नसल्याने मनविसे पदाधिकारी नालासोपारा शहर अध्यक्ष अमित नारकर याच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन अनधिकृत शाळा व स्थानिक प्रशासनावर कारवाईचे आदेश द्यावे या संदर्भातले निवेदन दिले. या निवेदनावर शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान निवेदना प्रसंगी शहर उपाध्यक्ष कैलास पवार, रोहिणी घाडघे, पंकज सावंत, देवेंद्र पालकर व महाराष्ट्र सैनिक शुभम सावंत उपस्थित होते.