आज 27 फेब्रुवारी. मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार म्हणून ओळखले जाणारे विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्म दिवस. हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसानिमित्त तमाम मराठी बांधवांना बातमीदारतर्फे मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
का साजरा केला जातो?
वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक ठरले. कुसुमाग्रजांना 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असून त्यानंतर महाराष्ट्र राज्यात राज्यसरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा ‘मराठी राजभाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यास सुरूवात केला. या दिवसाचे औचित्य साधून राज्यभर मराठी भाषा समुद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी आणि हिंदी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषा बोली भाषेत, लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवण आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर हा दिवस साजरा करून त्या कर्तव्याची जाणीव करून दिली जाते.
भारत देशातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जाते. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10 वी तर भारत देशातील 3 री भाषा आहे. 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे 9 कोटींच्या आसपास आहे.