विरारच्या भालीवली येथील वनवासी महिला आर्थिक हातभारासाठी बांबू पासून हस्तकलेद्वारे विविध आकर्षक व शोभेच्या वस्तू बनवतात. या कलेचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्यासमोर हस्तकला सादर केली. या आकर्षक हस्तकला पाहून राष्ट्रपती व राज्यपाल दोघेही भारावून गेले व अशी हस्तकला साकारणाऱ्या महिलांचे व संस्थेचे कौतुक केले.
पालघर जिल्ह्यात विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर हि सामाजिक संस्था गेल्या ९ वर्षांपासून वनवासी महिलांना रोजगार मिळावा या हेतूने त्यांना हस्तकलेचे प्रशिक्षण देत आहे. या हस्तकलेच्या माध्यमातून प्रशिक्षित महिला आता विविध आकर्षक अशा २१ प्रकारच्या कलाकृती साकारते. त्यात ट्रे, आकाश कंदील, मोबाईल होल्डर, राख्या, फ्रुट बास्केट, पेपरवेट, टी-कोस्टर इत्यादी सारख्या आकर्षक वस्तूंची निर्मिती होते. दरम्यान यामध्ये आतापर्यत १५०हुन अधिक महिला प्रशिक्षित झाल्या असून यामधील ८० हुन जास्त महिलानी घरच्या घरीच लघु उद्योग थाटला आहे. यामुळे या उद्योगातर्फे त्यांना रोजगाराची संधी मिळत असून आर्थिक लाभ होत आहे.
दरम्यान नुकतेच ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूच्या आकर्षक वस्तू राष्ट्रपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांना पुणे येथील राजभवनात भेटी दाखल देण्यात आल्या. राष्ट्रपतीनी बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले. तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्धल विवेक सेंटरच्या कार्याचेही कौतुक केले, पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या वनवासी भगिनींच्या मार्फत तयार करणाऱ्या वस्तूंचा अधिकाधिक उपयोग करून त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहनही केले.