न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेतील पराभवनंतर वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने भारतावर 10 गडी राखून मात केली. तर न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सातही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावलेल्या भारतीय संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. या पराभवाचे नेमके कारण भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले आहे.
विराट कोहली यांनी सांगितले की, ‘नाणेफेक हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, ज्याचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. फलंदाजी कोणत्याही मैदानात चांगली होईल असा आत्मविश्वास होता मात्र पहिल्या फळीच्या फलंदाजीमुळे आम्ही बॅकफुटवर गेलो आणि न्यूझीलंडने आघाडी घेत आमच्यावर दबाव टाकला’.
तसेच पराभवानंतरही विराटने संघाच्या गोलंदाजाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हंटले की, ‘संघाच्या गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली. पहिल्या डावात न्यूझीलंडने सात फलंदाज माघारी परतेपर्यंत आम्ही चांगला मारा करत होता. पण तळाच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी आम्हाला महागात पडली. संघाचे गोलंदाज आपल्या कामगिरीवर खुश नसले तरी त्यांच्या मला अभिमान वाटतो’.
भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लगला असला तरी या मालिकेतील दुसऱ्या सामना 29 फेब्रुवारीला ख्राईस्टचर्च मैदानात रंगणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत सामन्यातील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.