वसईच्या तुंगारेश्वर मंदिराच्या महाशिवरात्रीच्या यात्रेत एका १० वर्षीय तरुणीची छेड काढल्याची घटना समोर आली. दरम्यान हा प्रकार यात्रेतील भाविकांना कळताच, त्यांनी नराधमाला बेदम चोप दिला. यानंतर या नराधमाला वालीव पोलीसा ठाण्यातील पोलिसांच्या हवाली केले आहे. याप्रकरणी पोलीस तरुणाचा कसून तपास करीत आहेत.
तुंगारेश्वरच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक विविध परिसरातून येत असतात. त्यामुळे सकाळपासून महाशिवरात्रीच्या यात्रेला सुरुवात झाली होती. दरम्यान आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान एक १० वर्षीय तरुणी मंदिरात जात असताना यात्रे दरम्यान एका नराधमाने तिची छेड काढली. सदरची घटना इतर भाविकांना कळताच मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाला बेदम चोप देण्यात आला. त्यांनतर त्यांची धिंड काढत वालीव पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी वालीव पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.