विरारमध्ये गटारातील घातक प्रदूषित पाण्यावर पालेभाज्या पिकवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजार, हॉटेल आदी ठिकाणी सर्रास या सांडपाण्यावरील भाज्यांची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला जात आहे. खुलेआम गटाराच्या प्रदूषित पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केली जात असताना महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत येते.
विरार पूर्वच्या फुलपाडा परिसरात तीन ते चार एकरच्या मोकळ्या जागेत पालेभाजीचा मळा आहे. या मळ्यात पालक, मेथी, लालमाठ, शेपू, वांगे असा प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. मात्र हि लागवड कशी केली जाते हे पाहून आपण पालेभाजीचा खाणे बंद कराल अशी अवस्था आहे. या शेतीच्या नजीकमधून गटाराची लाईन जाते. हे पाणी अत्यंत प्रदूषित व दुर्गंधीयुक्त आहे. मानवी आरोग्यास हे प्रदूषित सांडपाणी घातक असून त्याचा वापर पालेभाज्या पिकवण्यासह त्या धुण्यासाठी केला जात आहे. या भाज्यांची बाजारात खुलेआम विक्री केली जात आहे. या भाज्या खाऊन नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत शकतो. यातून गंभीर स्वरुपाचे आजार आणि शारीरिक विकार बळावण्याची भीती आहे.
या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांकडून मात्र सोयीस्कर डोळेझाक केली जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या पालेभाज्यांची मळे उद्ध्वस्त करावी अशी मागणी आता जोर धरतेय. तसेच अन्न व औषध प्रशासनाने अशा बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांवर तरी कारवाई करावी. जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.