गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दराने आता ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सोनं पहिल्यांदाच प्रति 10 ग्रॅमसाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच इतका मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दराने भरारी घेतली आहे. या दराने लग्नसराईत सामान्य कुटुंबियांची निराशा झाली आहे.
लग्नसराईचा मोसम आणि कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थैर्यामुळं सोन्याकडे वळलेली गुंतवणूकदारांची नजर यामुळे सोन्याचे भाव कडाडल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे मत आहे.
आज राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०० रूपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 43,170 रूपयांवर पोहचला. देशाच्या इतिहासात सोन्याबे गाठलेला ऐतिहासिक स्तर आहे. आज चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये होता. दरम्यान बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा भावही किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला.