मुळशी पॅटर्न, देऊळ बंद या चित्रपटानंतर लेखक दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले आणि आपल्या प्रखर वक्तव्याने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता प्रविण तरडे लवकरच एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रविण तरडे यांनीच केले आहे.
काय आहे पोस्टरमध्ये?
आज शिवजयंतीचे औचित्य साधून स्वत: प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. पोस्टर पाहिल्यास सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका खूद्द प्रविण तरडे करणार असल्याचा अंदाज आहे. तसेच या चित्रपटात हिंदी, मराठी सृष्टीतील कलाकारांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांनी मान मिळवला होता. त्यांच्या कार्यावर आधारीत असलेला हा चित्रपट जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाऊंडेशन करत असून संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत.