प्रति पंढरपुर म्हणून दक्षिण कोकणात ओळख असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रा उत्सावाला सुरवात झाली आहे. काल रविवार पासून मुंबईवरुन अनेक चाकरमान्यांनी भराडीदेवीच्या दर्शनासाठी प्रस्तान केले आहे.
मुंबईसह संपुर्ण कोकण, पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून मोठ्या प्रमाणात भाविक या जत्रोत्सवा निमित्त देवीच्या दर्शनासाठी कोकणात दाखल होतात. यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेला विशेष राजकीय महत्व देखील प्राप्त झाले आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या जत्रोत्सवाला हजेरी लावणार आहेत. पुढील दोन दिवस मुख्यमंत्री कोकणात तळ ठोकुन असणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या विकास कामांचे भूमिपुजन ते करणार आहेत. तसेच या दौऱ्यात मुख्यमंत्री कोकणासाठी कोणती महत्वाची घोषणा करतात याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भराडीदेवीची महती
या जत्रोत्सवाच महत्व म्हणजे या यात्रेसाठी कोणतीही तिथी किंवा दिवस ठरलेला नसतो. तर देवीला कौल लावून त्यानुसार दरवर्षी हा यात्रा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी दोन दिवस हा जत्रोत्सवा चालतो. या दिवसात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा जवळपास 10 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडुन तसेच पोलिसांकडुन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जत्रोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडुन ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, दर्शन रांगांच्या ठिकाणी मंडप बांधण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्षक, पोलीस यांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.