मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक दमदार संहितेचे चित्रपट पाहायला मिळत आहेत. त्यात समाजप्रबोधन होत आहेच तर प्रेक्षकांना ताणमुक्त करण्याची जबाबदारी ही मराठी चित्रपटानी उचलली आहे. त्यातील एक विनोदीपट नुकताचा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातचे नाव आहे ‘विकुन टाक’. ‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’, ‘शेंटिमेंटल’ यांसारखे विनोदीपट दिलेल्या दिग्दर्शक समीर पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या मराठी चित्रपटात पहिल्यांदाच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहेत. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर त्यांच्या सोबत शिवराज वायचळ, राधा सागर, समीर चौगुले, हृषिकेश जोशी, रोहित माने, ऋजुता देशमुख, वर्षा दांदळे हे कलाकारही आहेत.
चित्रपटाची कथा
या चित्रपटाच्या कथे बद्दल बोलायचे झाले तर, मुकुंद तोरंबे (शिवराज वायचळ) या तरूणा भोवती फिरणारी हि कथा आहे. दुबईमध्ये तो नोकरी करत असतो. दुबईत नोकरीत करत असला तरी लातूर येथे राहणारा तो तरूण आहे. त्याला प्रेमाने मुक्या म्हणून ही हाक मारत असत. मुकुंदच्या डोक्यावर वडिलांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे असते. त्यामुळे तो दुबईत नोकरीसाठी जातो. पण तेवढ्यात त्याची आई त्याच्या लग्नाचा घाट घालते. त्यासाठी तो आता गावी आला आहे. पण कर्जमुळे त्याचे राहते घर बँकेकडून जप्तीची वेळ येते आणि त्याची नोकरीही जाते. तसेच याकारणाने त्याचे लग्नही मोडते. त्यावेळी त्याच्या सोबतीला त्याचे मित्र कान्या (रोहित माने) आणि मैत्रीण धनश्री (राधा सागर) असतात. कान्या हा ऑनलाईन भंगार विकायचं काम करतो. कर्ज फेडण्यासाठी पैशांची नड असलेल्या मुक्याला एक कल्पना सुचते आणि तो घरातील, गावातील वस्तू ऑनलाईन विकून पैसे जमा करायला लागतो. एके दिवशी दारुच्या नशेत तो स्वतःचाच फोटो ऑनलाईन टाकून स्वतःची किडनी विकणे आहे! असं पोस्ट करतो. आता कथानकाच्या याच वळणावर खरी गोष्ट सुरु होते. किडनी विकण्याच्या पोस्टमुळे मुक्याच्या आयुष्यात काय धुमशान घडते हेच सांगणारा हा ‘विकून टाक’ सिनेमा आहे. मुक्याचं कर्ज फेडलं जातं का? अवयव विक्री हा कायदेशीर गुन्हा असताना मुक्या आपली किडनी विकतो का? या प्रकरणाच्या निमित्तानं गावी आलेले शेख (चंकी पांडे) काय करतो? पोलिस मुक्याच्या मागावर का आहेत? या सगळ्याची उत्तरं सिनेमात मिळतील. पण, हा विकण्याचा खेळ फार काही मनोरंजक झालाय अशातला भाग नाही. सुमार विनोदांची भेळ पाहायला मिळते इतकंच.
कलाकरांच्या अभिनयाबद्दल
विकुन टाक चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर आपापल्या परीनं उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्याच्या भूमिकेत असलेल्या शिवराज वायचळने पडद्यावर केलेली धावपळ प्रामाणिक आहे. सोबतच मित्राच्या भूमिकेत असलेला रोहित माने हा चेहरा यापूर्वी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका विश्वात गाजलेला चेहरा आहे. सिनेमातील गाणी आणि पार्श्वसंगीत उत्तम असलं तरी एकंदरच हा ‘विकून टाक’चा मामला बेताचा झालाय असं म्हणावं लागेल.