मनोरंजनाच्या साधनातील सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनीक साधन म्हणजे ‘रेडिओ’. रेडिओचा शोध 1885 साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली ‘रेडिओ क्लब’ इथे झाली. त्यावेळी घराघरात अनेक गृहिणींची सकाळ ‘मंगलप्रभात’ रेडिओ वरील गाण्यांनी व्हायची. क्रिकेट रसिक असलेले सगळेच रेडिओस्टेशन वरील कॉमेंट्रीच्या सहाय्याने सामन्यांचा आनंद घ्यायचे. ज्याच्याकडे रेडिओ असेल त्याच्याकडे सगळेजण एकत्र जमायचे आणि रेडिओवर मॅच एकायचे. सामना जसाच्यातसा समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांच्या डोळ्यासमोर उभा करण्याची किमया क्रिकेट समोलोचकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून साधली. आकाशवाणीवर क्रिकेटचा सामना ऐकण्याची मजाच काही और होती.
बातम्या
आकाशवाणी वरुन बातम्या ऐकणारा वर्ग देखील खुप मोठा होता. संध्याकाळी कामावरुन लोक घरी पोहोचले की संध्याकाळी निवेदकाच्या वृक्ष आणि एका विशिष्ट पट्टीतील बातम्या सांगण्याच्या कलेवर अनेकांनी भरुभरुन प्रेम केले. आकाशवीणीच्या दिल्ली केंद्रावरुन 1939 साली मुंबईसाठी मराठीत बातमीपत्र सुरु झाले. 5 जुन पासून दिल्लीतून प्रसारीत होणारी ही बातमीपत्रे बंद झाली आहेत. दरम्यान, आकाशवाणीने इंटरनेटच्या माध्यमातून दर तासाला ताज्या बातम्या प्रसारीत करण्यास सुरूवात केली आहे. मराठी, पंजबी, तमिळ, तेलगु, कन्नड, आसामी, उर्दु आणि गुजराती अशा वेगवेगळ्या आठ भाषांमधून या बातम्या वाचल्या जातात.
अनेक कलाकारांसाठी ठरले प्लॅटफॉर्म
आजच्या युट्यूब, टिव्ही, इंटरनेटच्या जगतात प्रसिद्धीची अनेक माध्यमे उपलब्ध असताना गदिमांचे ‘गीतरामायण’, कवी मंगेश पाडगावकरांचा ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, अरुण दातेंचे ‘शुक्रतारा’ यांसारख्या अनेक गाण्यांची, कार्यक्रमाचीं आकाशवाणी द्योतक ठरली. रात्री झोपताना जुऩ्या गाण्यांच्या कार्यक्रमांची मैफल ऐकल्या नंतरच झोपण्याची कित्येकांना सवय लागली. त्याचबरोबर जाहिरातींसाठी त्यावेळी आकाशवाणी हे सगळ्यात प्रभावी माध्यम होते.
एफएम चा शोध
सन 1977 ला एफएम आले आणी आकाशवाणीच्या तंत्रज्ञानात आणखीनच भर पडली. अनेक खाजगी कंपन्यांद्वारे एफएम चॅनल्स चालवले जातात. एकट्या मुंबईत एकूण 16 एफएम वाहिन्या चालवल्या जातात. कित्येक घरांमधील गृहिणी आजही आकशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील कार्यक्रम ऐकतात. अनेक ट्रक, टॅक्सी ड्रायवर आजही रेडिओ ऐकतात.
टिव्हीचे आगमन
स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने, चोरून पत्रके छापणे आणि वाटणे याच्यासोबत चोरटे रेडिओ केंद्र चालविणे हाही एक महत्त्वाचा भाग होता. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. 1982 साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला.