प्रत्येक सणाला घरोघरी पुरणपोळी करायची पद्धत आहे. या गोड पुरणपोळीच्या जेवणात तिखट शेवभाजीची जोड असेल, तर जेवणाची मज्जा वेगळीच असते. याच पार्श्वभूमीवर शेवभाजी बनविण्याची पाककृती जाणून घेऊयात..
साहित्य :
तिखट मध्यम जाड शेव 1 वाटी, तिखट शेव बारीक वाटून 1 चमचा, 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, खोबऱ्याचे उभे काप 4 वाटी, 10 लसणाच्या पाकळ्या, आलं 2 इंच, धणे 1 चमचा, जिरं 1 चमचा, शेवभाजी मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा, कोथिंबीर चिरलेली 2 चमचे, मीठ चवीनुसार, तेल 2 चमचे, पाणी गरजेनुसार.
कृती :
- एका कढईत सुके खोबरे, धणे व जिरे घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून ताटात ठेवा.
- कढईत एक चमचा तेल घ्या, त्यात कापलेला कांदा घालून भाजून घ्या. भाजलेला मसाला थंड करून घ्या.
- आता भाजलेला मसाला, आलं, लसूण, सर्व मिक्सरमध्ये घाला व थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या.
- मग कढईत तेल घेऊन ते तापल्यावर वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- नंतर शेवभाजी मसाला, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतवून घ्या.
- मग तिखट बारीक वाटलेली शेव पावडर घाला व मसाला एकजीव करुन घ्या. नंतर थोडंसं गरम पाणी टाका.
- 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवा. म्हणजे मसाल्यातले तेल वर तरंगेल. मग गरजेनुसार गरम पाणी घालून रस्सा उकळू द्या.
- रस्सा उकळल्यावर चिरलेली कोथिंबीर टाका. त्यात शेव घालून 2 ते 3 मिनिटे उकळू द्या. आणि गॅस बंद करा…शेवभाजी तयार.