महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकीकडे बांगलादेशी आणि पाकिस्तान घूसखोरांविरोधात महामोचा काढण्याच्या तयारीत असतानाच, पक्षात काही बड्या नेत्यांची इनकमिंग झाली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेला या इनकमिंगचा आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे.
कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत नांदेड शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे.
राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी नाही. या हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे. शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील असा विश्वास यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला. तसेच रावसाहेब दानवेचा जावई मनसेमध्ये गेला म्हणजे आता मनसे आणि भाजप एकत्र येईल असे समजू नये असा इशारा देखील त्यांनी दिला.
राज ठाकरे ज्या पक्षासोबत जातील त्यासोबत आम्ही आहोत. कारण जे राजकारण बदलत आहे, त्यात राज ठाकरेंसोबत जावे वाटले. खूप दीर्घ काळापासून दूर होतो याची मला खंत आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.