नालासोपारा पश्चिमेतील एसटी डेपो आगारामध्ये आज अनधिकृत पार्कीग केलेल्या दुचाकी वाहनांची हवा काढून कारवाई करण्यात आली. या अनधिकृत पार्कीगचा त्रास रेल्वे प्रवाशांना व डेपो कर्मचाऱ्याना होत होता. मात्र आज करण्यात आलेल्या कारवाईने डेपो परिसर उद्यापासून मोकळा होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नालासोपारा पश्चिमेतील एसटी डेपो आगारातील अनधिकृत पार्किंगचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. आगाराने महापालिकेला निवेदन व नो पार्किंगचे बोर्ड लावून सुद्धा सर्रास वाहनधारक डेपो परिसरात विळखा घालून पार्किंग करत होते. या पार्किंगमुळे एसटीचालकांना बस लावण्यास व आगारा बाहेर काढण्यास अडथळा येत होता. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांना सुद्धा येण्या-जाण्यास त्रास होत होता. त्यामुळे हि डेपोतली हि समस्या सुटतच नव्हती.
अखेर आज नालासोपारा एसटी आगाराच्या व्यवस्थापिका प्रज्ञा सानप यांनी या वाहनधारकांबाबत कठोर भूमिका घेतली. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत आगारात उभ्या असलेल्या सर्व वाहनांच्या हवा काढल्या आहेत. जवळपास 500 ते 600 बेकायदेशीर उभ्या असेलल्या वाहनांची हवा काढून कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईमुळे आता डेपो परिसर मोकळा होण्याची शक्यता आहे. यामुळे एसटी चालकांना व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.